जनताच मला विजयी करणारः आढळराव पाटील

Image may contain: 1 person, eyeglasses and indoor
शिरूर, ता. 31 मार्च 2019: "शिरूर लोकसभा मतदारसंघात जनतेचा संपर्क मोठा असल्याने जनताच मला विजयी करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात काहीच केले नाही. त्यांच्या चुकांचे खापर माझ्यावर फोडून माझ्यावर टिका करणे योग्य नाही. जनताला हे माहित आहे, या वेळी विजयाचा चौकार मारणार आहे.' असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी महाळुंगे (ता. खेड) येथे महायुतीच्या वतीने जनसंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलताना  आढळराव पाटील म्हणाले, 'बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे. न्यायालयात दाद मागितली आहे. बैलगाडा शर्यती बंद असताना खासदार शरद पवार यांनी का प्रयत्न केले नाहीत? माझ्याबरोबर आमदार लांडगे, गोरे व सोनवणे हे देखील बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी आरोप करताना आपण सत्तेत असताना काय केले, हे पाहणे महत्त्वाचे आहे.'

'पुणे-नाशिक रेल्वेला केंद्रात भाजपचे सरकार असताना हिरवा कंदील मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी पुणे-नाशिक रेल्वेसाठी काहीच केले नाही. माझ्या पाठपुराव्यामुळे रेल्वेचे काम मार्गी लागत आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरणाचे कामही बहुतांश प्रमाणात झाले आहे. नाशिक फाटा ते राजगुरूनगर या रस्त्याचे कामही मार्गी लागणार आहे. यासाठी माझा सतत पाठपुरावा आहे. मुख्य शहरांची बाह्यवळणांची कामेही होणार आहे. पण, विरोधक टीका करताना वाहतूक कोंडीवर बोलतात. त्यांनी सत्तेत असताना काय केले? हा माझा सवाल आहे. चाकणला दोन बिनकामाचे पूल केले, हे त्यांचे पाप आहे. बैलगाडा शर्यती त्यांचे सरकार असताना बंद पडल्या, हेदेखील त्यांचे पाप आहे. त्याचे खापर खासदारांवर फोडणे चुकीचे आहे,' असेही आढळराव पाटील म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या