निवडणूक खासदारकीची; मात्र, तयारी आमदारकीची...

Image may contain: 13 people
शिरूर, ता. 7 एप्रिल 2019 : शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे. नेत्यांसह कार्यकर्ते उन्हातान्हाची पर्वा न करता प्रचार करताना दिसतात. मात्र, निवडणूक खासदारकीची असली तरी काही जण तयारी आमदारकीची करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

निवडणूक खासदारकीची असली तरी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उन्हातान्हाची पर्वा न करता इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

2008 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. यानंतरच्या 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील निवडून आले. 2014 च्या निवडणुकीतही आढळराव-पाटील पुन्हा जिंकले. त्यांच्या विजयाची आणि राष्ट्रवादीच्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी राष्ट्रवादीने यावेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांतल्या स्थानिक नेत्यांनी एकदिलाने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघातले माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार प्रचाराला लागले आहेत. बांदल यांना पक्षाचे उपप्रदेशाध्यक्षपद मिळाले असून, त्यांनीही प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे. याच मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही हिरीरीने प्रचारात भाग घेतला आहे. ही खासदारकीची निवडणूक असतानाही काही नेते आमदारकीसाठी प्रचार करत असताना दिसत आहेत.

कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील गावांना भेटी देण्यात आल्या. त्यावेळी कंद अ‍ॅड. पवार यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरल्याचे दिसले. अशोक पवार यांनी 2009 ते 2014 शिरूर हवेलीचे आमदार होते. मात्र, कोल्हेंच्या प्रचाराच्यानिमित्ताने कंद हेही मतदारसंघात घुसू लागले आहेत. संधी मिळेल तेव्हा शक्तिप्रदर्शन करण्याची स्पर्धा पवार आणि कंद यांच्यात लागली आहे. दोघांचे समर्थक सोशल मीडियावर छायाचित्रे अपलोड करताना दिसतात. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारामध्ये अनेकजण सहभागी झाले आहेत. यामधील काहीजण आमदारकीची तयारी करत असल्याचे बोलले जाते. आढळराव यांच्या प्रचारामध्ये आमदार बाबूराव पाचर्णे यांचाही सहभाग आहे.

थोडक्यात, निवडणूकीची खासदारकीची असली तरी काही नेते तयारी आमदारकीची करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याबद्दल तुम्हांला काय वाटते? जरूर व्यक्त व्हा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या