आढळराव पाटील यांनी 'असा' केला उमेदवारी अर्ज दाखल

Image may contain: one or more people, crowd and outdoor
पुणे, ता. 10 एप्रिल 2019: शिवसेना-भाजपचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेनंतर बैलगाडीतून रॅलीने जात आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या संकल्प सभेला पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबूराव पाचर्णे (शिरूर), डॉ. नीलम गोऱ्हे, सुरेश गोरे (खेड), शरद सोनवणे (जुन्नर), महेश लांडगे (भोसरी), योगेश टिळेकर (हडपसर), कल्पना आढळराव पाटील, सेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, अरुण गिरे आदी उपस्थित होते.

आढळराव बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पोचल्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. आढळराव यांनी बापट, ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत बैलगाडा शर्यतीचा गाडाही आढळराव यांच्या बैलगाडीसमोर होता. बैलगाडा आणि बैलगाडी अशी ही रॅली होती.

आढळराव म्हणाले, यापूर्वी मी लोकसभेच्या सलग तीन निवडणुका जिंकलो आहे. या प्रत्येक निवडणुकीत दरवेळी माझे मताधिक्‍य वाढतच गेलेले आहे. मतदारसंघातील बेरोजगारी, रस्ते आणि आरोग्यविषयक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत. शिवाय जनता-जनार्दनाचे आशीर्वाद पाठीशी आहेत. त्यामुळे किमान पाच लाखांहून अधिक मताधिक्‍याने विजयी होईन.'

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून 27 इच्छुक उमेदवारांचे 38 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (ता. 9) शेवटचा दिवस होता. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

शिरूर मतदारसंघासाठी 2 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. परंतु प्रमुख राजकीय पक्षांसह बहुतांश इच्छुकांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमोल कोल्हे यांच्यासह 19 इच्छुक उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (ता.10) होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार (ता. 12) आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या