डॉ. अमोल कोल्हे यांचा जोरदार शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल

Image may contain: 1 person, crowd, tree and outdoor
पुणे, ता. 10 एप्रिल 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब शिवरकर, विलास लांडे, अशोक पवार, पोपटराव गावडे, कमल ढोले पाटील, जालिंदर कामठे, प्रदीप कंद, राजलक्ष्मी भोसले, संजय जगताप, प्रदीप गारटकर, सुरेश घुले, सत्यशील शेरकर, अतुल बेनके, मंगलदास बांदल, गणपतराव फुलवडे, ऍड. संजय काळे, देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे हे पुण्यातील लष्कर परिसरातील जनरल पोस्ट ऑफिसपासून (जीपीओ) रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांच्याकडे त्यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले.

Image may contain: 6 people, people smiling, people standing
संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी अनुकूल आहे. माझ्याकडून जनतेच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता केली जाईल. सामान्य माणसाचा आवाज दिल्लीच्या तख्तावरती पोचविल्याशिवाय मावळा स्वस्थ बसणार नाही. सामान्य जनता, युवक, शेतकरी, महिला, माता व व्यापारीवर्गाकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, मी निवडून येणार आहे. चौकार मारू म्हणणाऱ्यांची दांडी जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर गुल होणार आहे. शिरूर मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक रेल्वे, मंचर-राजगुरुनगरची बाह्यवळणे ही कामे झाली नाहीत. खेडचे विमानतळ पळवून लावले. खासदार आढळराव पाटील स्वतः उद्योजक असूनही त्यांनी गेल्या 15 वर्षांत रोजगार निर्मितीसाठी एकही उद्योग उभा केला नाही. दिलेली आश्वासनेही त्यांनी पाळली नाहीत. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी रोष आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी दिली.

"राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार आहे. या उलट या सुप्त लाटेचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे,'' असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलाताना व्यक्त केले.

Image may contain: 18 people, crowd, tree and outdoor
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून 27 इच्छुक उमेदवारांचे 38 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (ता. 9) शेवटचा दिवस होता. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

शिरूर मतदारसंघासाठी 2 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. परंतु प्रमुख राजकीय पक्षांसह बहुतांश इच्छुकांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमोल कोल्हे यांच्यासह 19 इच्छुक उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (ता.10) होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार (ता. 12) आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या