...त्यांना अभिनयाशिवाय काय येणार?: आढळराव

Image may contain: one or more people, crowd and outdoor
शिरूर, ता. 13 एप्रिल 2019: शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आणि मागील निवडणुकीत माझ्याच प्रचारात माझे कौतुक करणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या बाबतीत मी अवाक्षरही बोललेलो नाही. ते मात्र बळंच माझ्याबद्दल बोलून मलाच आव्हान देतात. अभिनेते आहेत ते. त्यांना अभिनयाशिवाय काय येणार?, असे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठीवल भर दिला आहे. शिरूर शहरातून रॅली काढली होती. रॅलीत शिवसेनेसह भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. बसस्थानक परिसर, पाच कंदील चौक, रामआळी, मारुती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, बुरूड आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार, आडत बाजार या मार्गे जाऊन संभाजी नगर (हुडको वसाहत) येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीदरम्यान, आढळराव पाटील यांनी बसस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले प्रतिमा, इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या रॅलीत आढळराव पाटील यांच्यासह; आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नेते व कार्येकर्ते सहभागी झाले होते.

अभिनेता हवा की केंद्रीय मंत्रीः पाचर्णे
तुम्हाला अभिनेता हवा की नेता. तुम्हाला नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी. तुम्हाला अभिनेता हवा की भावी केंद्रीय मंत्री, असे अनेक प्रश्न विचारीत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच प्रचंड मताधिक्‍याने विजयी करण्याचे आवाहन केले.

पाचर्णे म्हणाले, 'डॉ. अमोल कोल्हे सुंदर अभिनय करतात म्हणून ते राजकारणात आले. मात्र, अभिनेत्यांची चलती शहरी भागात असते आणि अशा राजकारणी अभिनेत्यांमुळे कशी एखाद्या भागाची वाट लागते, त्याचे उदाहरण म्हणजे अभिनेता गोविंदा. त्यामुळे अशांना वेळीच ओळखा. अभिनेते स्वतः कधी बोलत नाहीत, तर त्यांचा मुखवटा बोलतो. हा मुखवटा दूर ठेवा आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होणार असलेल्या आढळराव पाटील यांना विजयी करा.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या