शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>>

संभाजीराजे विद्यालयात साकारला इको-फ्रेंडली 'बाप्पा'
Image may contain: foodजातेगाव बुद्रुक, ता. 10 सप्टेंबर 2019 (एन. बी. मुल्ला): येथील संभाजीराजे विद्यालयात १४ हजार ५०० बियांचा वापर करून बनविलेली बाप्पांच्या मोहक मूर्तीमुळे यंदाचा गणेशोत्सव हा ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचे प्रमुख साधन ठरले आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन नजरेसमोर ठेवत, विद्यालयातील प्राध्यापक विजय वरपे यांनी आंबा, चिंच, जांभूळ, नारळ, सुबाभुळ, लिंब, अशोक, बेहडा आदी निसर्गातील बियांचा वापर करून इको-फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केली आहे. याबाबतची संकल्पना स्पष्ट करताना प्राचार्य थिटे म्हणाले की, अशा प्रकारे तयार केलेल्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर बिया मूर्तीपासून वेगळ्या होऊन नदीच्या प्रवाहात वाहत जातील व  योग्य सखल भागात रुजतील. त्यामुळे नवीन झाडे निर्माण होऊन वृक्ष निर्मिती होईल आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षण व संवर्धन होईल. प्रा. वरपे यांच्या अभिनव प्रकल्पामुळे नदी प्रदुषण कमी होण्यास मदत होणार असून या प्रकल्पात कोणतेही पर्यावरणास हानीकारक घटक नाहीत त्यामुळे परिसरातून या इको-फ्रेंडली बाप्पाचे दर्शन घेण्यांस भाविकांची गर्दी होत आहे.

कोंढापुरीत जखमी उदमांजराला जीवदान
Image may contain: 4 people, people sitting and outdoor
कोंढापुरी, ता. 23 ऑगस्ट 2019: येथे विठ्ठलमंदिरा जवळ आढळून आलेल्या जखमी उदमांजराला येथील तरुणांनी जीवदान दिले असून, या उदमांजराला कात्रज येथील प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले आहे. विठ्ठल मंदिराच्या जवळ एक उदमांजर जखमी स्थितीत आढळले होते. नागरिकांनी तळेगाव ढमढेरे येथील सर्पमित्र गणेश टिळेकर यांना माहिती दिली असता त्यांनी त्वरित कोंढापुरी या ठिकाणी धाव घेत प्राणिमित्र रामेश्वर ढाकणे यांच्या मदतीने सदर जखमी उदमांजरास ताब्यात घेतले. जखमी उदमांजरास तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, मदतनीस जालिंदर भोसुरे, सचिन कांबळे यांनी जखमी उदमांजरावर प्राथमिक उपचार केले. उदमांजराच्या पायाला विजेचा धक्का लागल्यामुळे जखमी झाला असावा असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी व्यक्त केला. येथील उपचारानंतर या जखमी उदमांजरास कात्रज येथील प्राणि संग्रहालयात पाठविण्यात आले.

स्व. बाळासाहेब खैरे विचार मंचच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
शिक्रापूर, ता. 20 ऑगस्ट 2019: येथील स्व.बाळासाहेब खैरे विचार मंचच्या वतीने सांगली येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. स्व.खैरे विचार मंचच्या ५० कार्यकर्त्यांनी कसबे डिंग्रज (जि. सांगली) या पूरग्रस्त गावात जावून येथील लोकांना किराणा, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहीत खैरे, उद्योजक प्रशांत सासवडे, तेजस राऊत, विजय लोखंडे, दत्तात्रय भुजबळ, अक्षय वाबळे, प्रशांत वाघोले, अमोल भागवत, प्रणव भरणे आदी कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांसाठीची मदत एका ट्रकमध्ये भरून ती कसबे डिंग्रज ग्रामस्थांना प्रत्यक्ष नेऊन दिली व त्यांची आस्थेने विचारपूस केली. योग्यवेळी मिळालेल्या या मदतीने येथील ग्रामस्थ भारावून गेले.

भुजबळ विद्यालयाकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
Image may contain: 28 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. 20 ऑगस्ट 2019: येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली आहे. विद्यालयाच्या वतीने २० हजार रुपयांचे शालेय साहित्य कोल्हापूर मधील पूरग्रस्त भागातील  विद्यालयाला हे साहित्य दिले जाणार असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.

गुजर प्रशालेने जवानांसाठी पाठविल्या २ हजार राख्या
Image may contain: 10 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. 12 ऑगस्ट 2019 (एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील विद्यार्थिनींनी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी २ हजार राख्या व शुभेच्छा पत्रे पाठविली. प्रशालेचे उपप्राचार्य जगदीश राऊतमारे व शिक्षीकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे व विद्यार्थिनींचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते व प्राचार्य माणिक सातकर यांनी कौतुक केले.

शिक्रापूर एसटी स्थानक परीसरात चिखलाचे साम्राज्य
Image may contain: tree, sky, house, outdoor, nature and waterशिक्रापूर, ता. 9 ऑगस्ट 2019: शिक्रापूर एस.टी.स्थानकच्या परीसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, ठिकठिकाणी डबकीही साचली आहेत. शिक्रापूर बस स्थानकासाठी सुमारे अडीच एकराचा आवार आहे. मात्र, राज्य परीवहनाच्या दुर्लक्षामुळे परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी मुलभुत सुविधाही नसल्याने लांब पल्ल्याच्या गाडया बस स्थानकावर न येता पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील चाकण चौकात थांबून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. शिरूरहून पुण्याला जाणाऱया तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱया बस गाडया मात्र एस.टी.स्थानकवर थांबतात. एस.टी.स्थानकच्या आवारात खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून, सध्या पावसाळा असल्याने स्थानकच्या आवारात सर्वत्र डबकी साचली आहेत. संपूर्ण परीसर चिखलमय झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडथळयांना सामोरे जावे लागत आहे. परीवहन महामंडळाने एस.टी.स्थानक आवाराची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थिनींनी पाठवल्या राख्या
Image may contain: 19 people, people standing and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. 4 ऑगस्ट 2019 (एन. बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथील जि.प.प्राथमिक शाळा नंबर २ मधील मुलींनी सीमेवरील जवानांना राख्या पाठवून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक विठ्ठल जगताप, जालिंदर ढमढेरे, आनंदराव ढमढेरे, भाऊसाहेब गोरडे यांना मुलींनी औक्षण करून राख्या बांधल्या. प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या सैनिकांबद्दल मुलींनी कुतूहलाने खूप प्रश्न विचारले व त्यांना माजी सैनिकांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येत असलेल्या राख्या माजी सैनिकांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी विठ्ठल जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी केले. मीनाक्षी गवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कासारी येथे महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन
Image may contain: 27 people, people smiling, people standing and indoor
कासारी, ता. 3 ऑगस्ट 2019 (आकाश भोरडे): समाजातील महिलांनी छोटासा उद्योग-व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे रहावे या हेतूने महिला सरपंच सुनीताताई भुजबळ यांच्या पुढाकारातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत कासारी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील महिलांना व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण घेता यावे म्हणून मोफत ब्युटी पार्लर कोर्स प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ भुजबळ, किरण रासकर, ग्रामविकास अधिकारी श्रीमती ठुबे, श्री. बेंद्रे व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिरूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सयाजीराव गायकवाड
शिरूर, 3 ऑगस्ट 2019: शिरूर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सयाजीराव गायकवाड बहुमताने निवडून आले. उपाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिरूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी गायकवाड व दिलीप गिरमकर यांच्यात लढत झाली. गायकवाड यांना 84; तर गिरमकर यांना 78 मते मिळाली. प्रताप शिंदे, प्रदीप बारवकर व सरिता खेडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवड झालेले बार असोसिएशनचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः उपाध्यक्ष- उदय सरोदे, रंजना गायकवाड, सचिव- साहेबराव जाधव, खजिनदार- यमराज शिंदे; कार्यकारिणी सदस्य- श्रीधर हरगुडे, महिपती काळे, अक्षय पाचर्णे, अमृता खेडकर, वर्षाराणी वडगावकर. ज्येष्ठ वकील ऍड. संजय वाखारे, बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष ऍड. दीपक ढमढेरे, माजी अध्यक्ष निवृत्ती वाखारे, संजय येवले, सुभाष गायकवाड, सुहास ढमढेरे, आर. व्ही. जाधव यांच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष गायकवाड व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे येथे खड्ड्यात रस्ते
Image may contain: sky, tree, basketball court, outdoor and nature
शिक्रापूर, ता. 1 ऑगस्ट 2019 (एन.बी. मुल्ला): शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रस्त्याची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्डयात पाणी साचल्याने खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. साईड पट्ट्याही तुटल्याने तसेच रस्त्यावर चिखलाचेही साम्राज्य झाल्याने दुचाकीस्वारांना तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वरून जाताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

उद्योजक अजय जगदाळे यांनी वाचवले एकाचे प्राण!
Image may contain: Ganesh Shindeकारेगाव, ता. 30 जुलै 2019: पुणे-नगर रोडवर व्हर्लपूल कंपनीच्या समोर सोमवारी (ता. २९) रोजी रात्री ८ च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. करडे येथील उद्योजक अजय जगदाळे प्रवास करत असताना त्यांचे लक्ष त्या व्यक्तीकडे गेले. जगदाळे यांनी त्या बेशुद्ध असलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी त्या पाईप लाईनच्या कामासाठी असलेले ब्यारीगेट रस्त्यावर लावले व पोलिसांना फोन केला. पोलिसही तातडीने घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला दवाखान्यात हलवण्यात आले. सदर व्यक्तीचे नाव कळू शकले नाही. जगदाळे यांनी माणुसकी दाखवल्याने एका निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचले याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या पुणे-नगर रोडच्या कडेने गॅस पाईपचे काम चालू आहे.


तळेगाव ढमढेरे येथील पायी दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान
Image may contain: 10 people, people standing, crowd and outdoorतळेगाव ढमढेरे, ता. 28 जून 2019 : येथील दिंडीचे आळंदीहून पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले. या पायी दिंडी मध्ये १००  वारकरी असून बापूसाहेब ढमढेरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच अरविंददादा ढमढेरे, मार्तंड ढमढेरे व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाच्या मागे या दिंडी क्रमांक १४४ चे आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

घोलपवाडीत पालखी रथाच्या बैलजोडीचे पुजन
टाकळी भीमा, ता. 21 जून 2019 (आकाश भोरडे): येथील श्री संत सदगुरू योगीराज बाबा महाराज पालखी सोहळ्याच्या रथासाठी घोलपवाडी येथील रोहिदास अर्जुन ढेकणे व साहेबराव अर्जुन ढेकणे यांच्या 'बबड्या-सुंदर' या बैलजोडीची निवड करण्यात आली आहे. या बैलजोडीचे पूजन पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलतात्या महिपती वडघुले यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच पांडुरंग ढोरे यांनी स्वागत केले. या पालखी सोहळ्याचे टाकळी भीमा येथून रविवार (ता. 30) दुपारी एक वाजता पंढरीनाथ पठारे यांच्या हस्ते पुजन करून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावेळी रामेश्वर महाराज इंगळे यांचे कीर्तन होणार आहे. संत योगीराज बाबा पालखी सोहळ्याचे हे चौदावे वर्ष आहे. निवडलेल्या बैलजोडीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या