सणसवाडीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक

Image may contain: 1 person, standing, outdoor and foodसणसवाडी,ता.३ मे २०१९(प्रतिनीधी) : सणसवाडी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक झाली. आगीत मुलीच्या लग्नाचा बस्ता व घरातील वस्तूही जळून खाक झाल्या तर तीन जण किरकोळ जखमी झाले.

सणसवाडी (ता. शिरूर) येथील चेअरमनवस्ती येथील तात्याभाऊ जयवंत दरेकर यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा आज गुरुवार(दि.२ मे) रोजी सकाळच्या सुमारास स्फोट झाला. तात्याभाऊ दरेकर यांची सून मनीषा ही घरातील गॅसला सिलेंडरची टाकी जोडत असताना अचानक आगीचा भडका झाला. त्यावेळी मनीषा हि घरातील मुलांना घेऊन घराबाहेर ओरडत पळाली. क्षणार्धात घरात आग लागली त्यांनतर आगीने घराला वेढा घेत घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी गॅस सिलेंडरचा स्फोट होताच घरावरील कौले उडून शेजारील घरांवर व आजूबाजूला विखुरली गेली. त्यामुळे तात्याभाऊ यांच्यासह त्यांचे भाऊ दत्तात्रय जयवंत दरेकर, मच्छिंद्र जयवंत दरेकर, किसन जयवंत दरेकर यांच्या घरांनाही आग लागली.

यावेळी गॅस सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आल्याने शेजारील नागरिक धावत आले परंतु यावेळी   घरांना आगीने वेढा घातला होता व आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले होते. आगीमुळे शेजारील घरातील देखील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या  घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक दलाला बोलाविले. यावेळी सणसवाडी येथील काळूराम दरेकर, महेंद्र दरेकर, राजेंद्र दरेकर, माणिक हरगुडे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. काही वेळाने रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक दल आल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी लागलेल्या आगीमध्ये घरातील कपडे, धान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे, रोख रक्कम यांसह आदी चीज वस्तू नष्ट झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तर या घरांना लागलेल्या आगींमध्ये आठवडाभरावर आलेल्या घरातील मुलीच्या लग्नासाठी लग्नाचा बस्ता तसेच लग्नाच्या काही वस्तू देखील जळून खाक झाल्या आहेत. आगीमध्ये नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्ताना शासनाच्या वतीने नुकसानभरपाई देण्याची मागणी नवनाथ हरगुडे यांनी केली असून सदर घटनेचा तलाठी संतोष गाडगे यांनी पंचनामा केला असून या आगीमध्ये सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुलीच्या लग्नाच्या वस्तू व लग्नाचा बस्ताही जळून खाक
सणसवाडी (ता. शिरूर) येथे आग लागून आगीमध्ये घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना  घरातील एका मुलीचे लग्न आठ दिवसांवर आलेले असल्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या काही वस्तू तसेच लग्नाचे कपडे व बस्ता देखील जळून खाक झाला.

रांजणगाव सांडस येथे आगीत घर जळून खाक
रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील लोखंडे वस्तीवरील ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे यांचे गवती छपराचे घर, एक दुचाकी, वस्तू आगीत जळाल्या. बुधवारी (ता. 1) ही घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट आहे नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या