शिरूरचा पाणीपुरवठा सुरळीत; 25 पंपांचे 'कनेक्‍शन कट'

Image may contain: cloud, sky and outdoor

शिरूर, ता. 15 मे 2019: शिरूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला असून, पिण्यासाठी राखीव असलेल्या सोनेसांगवीच्या (ता. शिरूर) तळ्यातून शेतीसाठी पाणीउपसा करणाऱ्या सुमारे 25 वीज पंपांचे "कनेक्‍शन कट' करण्यात आले आहे.

पिण्यासाठी राखीव असलेल्या सोनेसांगवीच्या (ता. शिरूर) तळ्यातून शेतीसाठी पाणीउपसा करणाऱ्या सुमारे 25 वीज पंपांचे "कनेक्‍शन कट' करण्यात आले असून, यापुढे बेकायदा पाणीउपसा करणारांविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन नायब तहसीलदार डी. के. जाधव यांनी दिल्यानंतर, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाई पोपटराव बोऱ्हाडे पाटील यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले.

या आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली. नायब तहसीलदार जाधव, तलाठी श्री. सातपुते, ग्रामसेवक देविदास विश्‍वास यांनी भाई बोऱ्हाडे यांची भेट घेऊन, पिण्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा शेतीसाठी बेकायदा उपसा करणाऱ्या मोटारींचा वीजपुरवठा तोडला असून संबंधितांविरूद्ध कारवाईसाठी तहसीलदारांकडे अहवाल सादर केला जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर भाई बोऱ्हाडे यांनी मंगळवारी (ता. 14) उपोषण मागे घेतले.

शिरूरला सुरळीत पाणीपुरवठा
शिरूर: येडगाव धरणातून पाणी उचलून ते कुकडी डाव्या कालव्यातून शिरूरसाठी सोडण्यात आल्याने मंगळवारी दुपारपर्यंत शहराच्या पाणी योजनेतील घोडनदीवरील कोल्हापूर बंधारा निम्म्याहून जास्त भरला. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लागला आहे. शहरात उद्यापासून (बुधवार) सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे. पाटबंधारे खात्याने मंगळवारी सकाळपासून कुकडी डाव्या कालव्याचा विसर्ग वाढवला. या कालव्याच्या राळेगण थेरपाळजवळील 61 क्रमांकाच्या वितरिकेचा वेग वाढवून ओढ्यामार्फत थेट शहराच्या बंधाऱ्यात पाणी सोडले. ओढ्यातून पाणी उपसा करणाऱ्या मोटारींचा वीजपुरवठाही खंडित केला. त्यामुळे दुपारी दोनपर्यंत बंधाऱ्यात वेगाने पाणी जमा झाले. चारपर्यंत बंधारा निम्म्यापेक्षा जास्त भरला होता. दोन दिवसांत बंधारा पूर्ण क्षमतेने भरेल, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. कानडे यांनी सांगितले.


पाण्यासाठी सोनेसांगवी ग्रामस्थ आक्रमक
शिरूर, ता. 11 मे 2019:
सोनेसांगवी गावाला पिण्यासाठी म्हणून राखून ठेवलेल्या तळ्यातील पाण्याचा उपसा बडे राजकारणी शेतीसाठी करीत असल्याने येथील ग्रामस्थ पाण्यावरून संतप्त झाले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य भाई पोपटराव बोऱ्हाडे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.

सोनेसांगवी येथील सोनारमळा पाझर तलावात गेल्या 18 एप्रिलला डिंभेतून पिण्यासाठी म्हणून पाणी सोडण्यात आले. गाव व परिसरातील सुमारे तीन हजार लोकसंख्येला दोन महिने हे पाणी पुरणार होते. परंतु, 25 ते तीस वीजपंपांनी तलावातील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने 15 दिवसांतच पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे या मोटारींचा वीजपुरवठा तोडावा किंवा मोटारी जप्त कराव्यात, या मागणीसाठी भाई बोऱ्हाडे हे हनुमान मंदिरात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

शिरूर शहराचा पाणीपुरवठा झाला विस्कळित
शिरूर, ता. 10 मे 2019: घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा पडल्याने शिरूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. नदीपात्रातील खड्ड्यांमधील पाणी उचलून ते शहराला पुरविण्याची वेळ नगर परिषदेवर आली आहे. शहरात गुरुवारी (ता. 9) पाणीपुरवठा होऊ न शकल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.

दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा पडला असून, तेंव्हापासून पाणी टंचाईचाला सुरवात झाली आहे. पाच मार्चला, डिंभे धरणातून घोडनदीद्वारे शिरूर शहराला पिण्यासाठी म्हणून पाणी सोडण्यात आले. मात्र, 26 बंधारे पार करून शिरूरपर्यंत हे पाणी येण्यास तब्बल 13 दिवसांचा कालावधी लागला. त्या कालावधीत सुमारे पन्नास हजार लोकसंख्येच्या शहराला मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. तशातच 18 मार्चला बंधाऱ्यात पाणी साठू लागल्यानंतर 19 मार्चला ते बंद करण्यात आल्याने, बंधारा पूर्ण क्षमतेने भरू शकला नव्हता. या बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता 55 दशलक्ष घनफूट इतकी असून, बंधारा पूर्ण भरल्यास ते पाणी शहराला दोन महिने पुरते. तथापि, बंधारा निम्माच भरला असतानाही, शिरूर व प्रामुख्याने पारनेर तालुका हद्दीतील नदीकिनारच्या शेतकऱ्यांनी विद्युत पंपाद्वारे शेतीसाठी मोठा उपसा केला. त्यातच मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन सद्यःस्थितीत बंधारा कोरडा पडला आहे. या बंधाऱ्यात, काही अंतरावर नदीपात्रात जॅकवेल असून, तेथून पाणी पंपिंग करून ते शहराला पुरविले जाते. सध्या नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये साठलेले पाणी, नदीत छोट्या चारी खोदून व मोटारी लावून या जॅकवेलपर्यंत आणले जाते व तेथून खेचून शहराला पुरविले जात आहे. यामध्येही तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

दरम्यान, शिरूर शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या