शिरूर तालुक्यातील लुटमारी करणारे तिघे अटकेत

Image may contain: 10 people, people standing and outdoor
शिरूर, ता. 14 मे 2019: पुणे जिल्ह्यात महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या टोळीस पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर-चौफुला रस्त्यावर जालिंदर हरिराम पवार (वय 24, रा. पिंपळवंडी, ता.पतोडा, जि. बीड) हे नागरगाव हद्दीत शिरुर चौफुला रोडने मालट्रक घेऊन जात असताना तिघांनी मोटरसायकल वरुन येऊन ट्रक अडवला. ट्रक खाली ओढून मारहाण करुन 1,28,000 रुपये, ब्रेसलेट, मोबाइल काढून घेतला. याबाबत त्यांनी 13 एप्रिल रोजी शिरूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. या घटनेचा पूणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते.

दरम्यान, तपास करत असताना गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. या नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून महेश गणेश महुल्कर, गोरख केरबा जाधव, उमेश सागर अडगले, करण विजय ढिले (सर्व रा. टाकळी भीमा ता.शिरुर जि.पुणे), विशाल सुरेश धोंगडे (वय 29, रा. तळेगाव) यांना ताब्यात घेतले. या वेळी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या आरोपींनी पुणे-नगर महामार्ग, शिरूर चौफुला महामार्ग, चाकण महामार्ग तसेच इतर ठिकाणी अशाच स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य केली आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घणवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद लीमन, राजू मोमीन, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे, पोलिस मित्र अन्सार कोरबू यांनी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या