दत्तक करंदीकरांकडून आढळरावांना 'दे धक्का'

करंदी, ता. 24 मे 2019 (विशाल वर्पे) : करंदी (ता. शिरूर) हे गाव माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करून घेतल्यानंतर पावणेपाच कोटींचा विकास कामे केल्याचा दावा करून देखील आढळराव यांना मतदारांनी चकवा देत विजयी उमेदवार अमोल कोल्हे यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेऊन त्या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सांसद आदर्श ग्राम योजना राबविण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील करंदी या गावाची निवड केली होती. त्यानंतर सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत आढळराव यांनी पावणेपाच कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा केला होता. करंदीत अनेक विकास कामे मार्गी लावण्यात ते यशस्वी झाले होते. मात्र, तरी देखील करंदीच्या मतदारांनी एकूण झालेल्या २४७२ मतदानापैकी राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या पारड्यात तब्बल १५५३ मते टाकली तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना मात्र ८२१ मतांवर समाधान व्यक्त करावे लागले आहे.
 
गावच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या राष्ट्रवादीचे आणि शिरूर बाजार समितीचे संचालक शंकर जांभळकर यांनी शिवसेनेच्या माजी उपतालुकप्रमुख विकास दरेकर यांच्यासह बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाबाजी कंद्रुप यांना राष्ट्रवादीमध्ये सामील करून घेत गावच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकत्र मूठ बांधली आणि ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व असून देखील विकास दरेकर राजाभाऊ ढोकले आणि सुहास ढोकले यांच्या सहकार्याने राष्ट्रवादीच्या बाजूने मतदार वळविण्यात यशस्वी झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

शिवसैनिकांनी देखील तेवढ्याच ताकदीने आढळरावांचा प्रचार केला होता. माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन कार्यकर्त्यांना चार्जिंग केले होते. मात्र, स्थानिक पदाधिकारी विकास कामे आणि आढळरावांची कार्यप्रणाली मतदारांपर्यंत पोहचविण्यास कमी पडल्याचे चित्र मतदानातून दिसून आले आहे.

गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांनी गावात कारखान्याच्या माध्यमातून विकासकामे केल्याचा दावा करून देखील शिवाजी आढळराव पाटील यांनी याच करंदी गावातून जवळपास तेराशे मतांची आघाडी घेतली होती. त्याच तुलनेत यावेळी आदर्शग्राम योजनेतून आढळरावांनी अनेक विकासकामे केल्यानंतर त्यांच्या विरोधात शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हे हे नवखे उमेदवार असून देखील विजयी होत ७३२ मतांची आघाडी घेतली आहे.
 
करंदीच्या २०१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवार हे जवळपास सर्वच शिवसेनेच्या विचारांचे होते त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत देखील यापेक्षा अधिक मतदान शिवसेनेला मिळाले होते. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं यश की शिवसेना कार्यकर्त्यांचे अपयश हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण यावेळी फक्त ८३२ मतांवर शिवसेनेला समाधान व्यक्त करावे लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या