शिरूरमध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा; मान्सून लांबणीवर

Image may contain: one or more people, sky, nature and outdoor
शिरूर, ता. 28 मे 2019 : शिरूर तालुक्‍यातील विविध भागांमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पाणी मिळत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या वर्षी पावसाने दडी मारल्याने नोव्हेंबर महिन्यापासून पाण्याची गंभीर समस्या जाणवू लागली आहे. तालुक्यातील विविध भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली. टॅंकरमधून पाणी पुरवठा केला जात असला तरी तो पुरेसा ठरत नाही. कान्हूर मेसाई येथे ग्रामस्थांनी पाणी योजना आणल्याने तेथील टॅंकर बंद करण्यात आला. येथे पाण्याची उपलब्धता झाली नसून, येथे पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान या भागात चारा छावणी सुरू झाल्याने जनावरांची पाणी व चाऱ्याची सुविधा झाली आहे. पाण्याचे टॅंकर सुरू राहावेत यासाठी नागरिक पुन्हा मागणी करू लागले आहे.

नदीला पाणी सोडले असतानाही गावापर्यंत पाणी आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आमदाबादमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याचा परिणाम विधानसभेवर दाखवून देणार आहोत, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. ऊस व फळबागा सुकून गेल्या असून जनावरे सांभाळायची कशी अशी चिंता या भागातील नागरिकांमध्ये आहे. घोडनदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंबेगाव भागात बंधाऱ्यांना असणारे पाणी पिण्यासाठी का होईना शिरूर तालुक्‍याला सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मान्सून १७ जूनपर्यंत लांबणीवर
सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असले, तरी यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात १७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा २०-३० टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे धरणसाठे जपून वापरण्याबरोबरच शेतकऱ्यांनी पेरणीची घाईदेखील करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अंदमानमध्ये २० मेच्या सुमारास मान्सून दाखल झाला. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढे राज्यात मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, कोकण किनारपट्टी भागात मान्सूनची हजेरी यंदा लांबणार आहे. दरवर्षी साधारण ५ ते ७ जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा १२ जूननंतर कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. या वेळी पावसाचा जोर असणार नाही. गेल्या वर्षी किनारपट्टी भागात २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. मात्र, त्यापुढील वाटचाल झाली नव्हती. मान्सून दाखल होऊन त्याची पुढील वाटचाल कशी होते, हे महत्त्वाचे आहे. यंदा किनारपट्टी भागातच मान्सून पाच ते सहा दिवस उशिरा दाखल होत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे त्याचे राज्यातील आगमनही आणखी लांबेल, असे दिसते. दोन वर्षे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. यंदा राज्यात टँकरद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करावा लागत आहे. याशिवाय चारा छावण्या उभारण्याची वेळही आली.

पावसाला उशीर होण्याची कारणे काय?
एल निनोची स्थिती सामान्य आहे. मान्सून सक्रिय राहण्यासाठी समुद्राचे तापमान, हवेचा वेग असे विविध घटक कारणीभूत असतात. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी २८ ते २९ डिग्री असते. हिंद महासागराच्या पूर्व भागाचे तापमान १ अंशाने कमी आणि पश्चिम भागाचे तापमान एक अंशाने जास्त असावे लागते. मान्सून पुढे जाण्यासाठी वाऱयाचा वेगही योग्य असावा लागतो. आत्ता तशी स्थिती नाही. त्यामुळे जूनमधे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या