काँग्रेस-राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाही : शरद पवार

Image may contain: 1 person, sitting, table and indoorनवी दिल्ली, ता. 31 मे 2019 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार यासंदर्भात वृत्त प्रसारीत झाल्यानंतर चर्चेला उधान आले होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विलीनकरणाच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या होत्या. परंतु, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधीं यांनी गुरुवारी (ता. 30) शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे झालं, त्याची तपशीलवार माहिती घेतली. लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे त्यासंदर्भात रणनीती तातडीने ठरवण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आहे का? तुम्हाला राज्यसभेत विरोधीपक्षनेतेपदाची ऑफर आहे का? या प्रश्नावर नेतृत्वाची कमतरता असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असावे, असं उत्तर पवारांनी हसून दिलं.

समोर पर्याय दिसत नसताना मैदान सोडणं योग्य नाही, असं परखड मत शरद पवारांनी राहुल गांधींनी दिलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर व्यक्त केले. आपण असे अनेक पराभव पाहिलेले आहेत. यातून सावरण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. तो नक्कीच करता येईल, असे शरद पवार म्हणाले.

तर इतिहासाची पुनरावृत्ती...
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला तर ती इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल. शरद पवारांनी यापूर्वी 1986 मध्ये त्यांचा समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये हे विलीनीकरण पार पडले होते.

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. काँग्रेसकडे सध्या केवळ 51 खासदारांचे संख्याबळ आहे. लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे 5 खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेमध्ये विलीन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांचे संख्याबळ 55 पेक्षा जास्त होईल, त्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. काँग्रेसने केवळ 44 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाला मुकावे लागले होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते, परंतु काँग्रेसकडे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद नव्हते. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 51 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यंदादेखील काँग्रेसला लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळेच राहुल गांधी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या