जय जवान, जय किसान; शेतकऱयांना मिळणार अनुदान

Image may contain: 1 person, outdoor and nature
नवी दिल्ली, ता. 1 जून 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर नव्या मंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी आज त्यांच्या पदभार स्वीकारला. शुक्रवारी (ता. 31) दुपारी मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली. नव्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने जय जवान, जय किसानला खुष केले असून, किसान योजनेत आणि पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत बदल केला आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे 15 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याआधी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या (अल्पभूदारक) शेतकऱ्यांना सरकारकडून 6 हजारांचा निधी दिला जात होता. मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

तोमर म्हणाले, 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत 3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्यात आला आहे. या योजनेवर पूर्वी 75 हजार कोटी रुपये खर्च होत होता. आता त्यामध्ये 12 हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी 87 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. त्यासाठी या पेन्शनमध्ये सहभागी शेतकऱ्यांना दिवसाला दोन ते सहा रुपये प्रिमियम भरावा लागणार आहे.'

दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाने हुतात्मा कुटुंबासाठी पहिला निर्णय घेतला आहे. नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांचा शिष्यवृत्ती योजनेत बदल करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीत 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतंर्गत दर महिन्याला देण्यात येणाऱ्या मुलांच्या शिष्यवृत्तीची रक्कम दोन हजारावरुन अडीच हजार आणि मुलींच्या शिष्यवृत्तीची रक्कम 2250 वरुन तीन हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या