कन्येच्या विवाहापूर्वीच पित्यावर काळाचा घाला...

No photo description available.शिरूर, ता. 1 जून 2019 : कन्येच्या विवाहापूर्वीच पित्यावर काळाने घाला घातल्यामुळे परिवारावर दुःख कोसळले आहे. कन्येच्या विवाहाच्या पत्रिका वाटत असताना अपघात झाला. या अपघातात पित्याचा मृत्यू झाला.

कान्हूर मेसाई-मलठण रस्त्यावर अज्ञात वाहनचालकाने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे मुलीचे वडील सदाशिव मारुती डफळ (वय 53) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत शरद लक्ष्मण डफळ (रा. धामारी, ता. शिरूर) यांनी तक्रार दिली आहे.

शुक्रवारी (ता. 1) दुपारी साडेतीनच्या सुमारास कान्हूर मेसाई-मलठण रस्त्यावर चिंचोली मोराची हद्दीतील फाट्याजवळ महादेव गणपत डफळ व सदाशिव मारुती डफळ हे दोघेजण मुलीच्या विवाहाच्या पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीवरून जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात सदाशिव डफळ यांचा जागीच मृत्यू झाला तर महादेव गणपत डफळ (वय 50, रा. धामारी) हे गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विवाहापूर्वीच पित्याचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःख पसरले आहे. कन्येचा विवाह पुढील आठवड्यात होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या