पुण्यातील प्रसिद्ध 'एसपीज्' बिर्याणीमध्ये आढळली अळी (Video)

Image may contain: food
पुणे, ता. 3 जून 2019 : पुण्यातील प्रसिद्ध एसपीज् बिर्याणी या हॉटेलमध्ये बिर्याणीत अळी सापडल्याचा आरोप एका ग्राहकाने केला असून, संबंधित छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विरेंद्र ठाकूर हे आपल्या मुलासह रविवारी (ता. 2) दुपारी एसपीज् बिर्याणीमध्ये जेवण्यासाठी गेले होते, त्यावेळी हा प्रकार घडला. विरेंद्र यांना बिर्याणी खाताना ताटात अळी दिसली. त्यानंतर त्यांनी याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा सगळा प्रकार त्यांनी एसपीज् बिर्याणी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिला, मात्र एसपीज् बिर्याणी व्यवस्थापनाने त्यांचे आरोप फेटाळून लावले. बिर्याणी 100 ते 130 डिग्री तापमानाला शिजवली जाते, त्या तापमानाला अळी राहूच शकत नाही, असा दावा एसपीज् व्यवस्थापनाने केला आहे.

बिर्याणी एवढी गरम असते की त्या तापमानात अळी अक्षरश: वितळून जाऊ शकते. एसपीज् बिर्याणी पुण्यात आणि पुण्याबाहेर सर्वत्र प्रसिद्ध आहे. विविध ठिकाणाहून खवय्ये येथील बिर्याणी खाण्यासाठी येतात. त्यामुळे आपल्या व्यवसायाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असे हॉटेलच्यावतीने सांगण्यात आले. दुसरीकडे विरेंद्र ठाकूर या व्यक्तीने एसपीज् बिर्याणीच्या व्यवस्थापनाने आपली माफी मागावी, अशी मागणी केली आहे. एसपीज् बिर्याणीच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आज तक्रार करणार असल्याचे सांगितले.


दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वीच बर्गरकिंगच्या बर्गरमद्ये काचेचे तुकडे आढळून आले होते. शिवाय, मंगळवार पेठेतील शारदा स्वीट सेंटरमधील सामोसाच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळून आला होता. त्यावेळीही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या