भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीची यशाला गवसणी

देवदैठण,ता.४ जुन २०१९ (प्रा.संदीप घावटे) : शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या वृषाली रावसाहेब घावटे या भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने बारावी विज्ञान शाखेत ९० .३१ टक्के गुण मिळवुन शालेय जीवनातील महत्वाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे.

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील असणारी वृषाली हीने विद्याधाम विज्ञान महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला. तर मुलींच्यात ती अव्वल ठरली. लहानपासूनच हुशार असणाऱ्या वृषालीचे वडील वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावच्या आठवडे बाजारात जाऊन भाजीपाला विक्रीचे काम करतात. मुलीसाठी लागणारी पुस्तके, इतर साहित्य याची कमतरता कधी त्यांनी जाणवु दिली नाही.वडीलांनी घेतलेल्या कष्टाचे मुलीने चीज केले आहे. मुलीने खुप शिकावे, डॉक्टर व्हावे यासाठी आणखी कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे.

विद्याधाममध्ये शिकत असताना राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात तिच्या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले होते.तसेच वक्तृत्व स्पर्धेतही तीने चमक दाखवली होती.इयत्ता दहावीमध्ये सेमी इंग्रजी माध्यमात तीने ९७ टक्के गुण मिळवले होते.बारावीलाही चांगले गुण मिळवायचे या जिद्दीने ती सातत्याने आठ ते दहा तास अभ्यास करत होती.वृषालीला पुढे मेडीकलला जाऊन डॉक्टर बनायचे  आहे.त्यासाठी तीने प्रवेश परीक्षा दिली आहे.बारावीला खुप अभ्यास केला होता.या यशाचे श्रेय तीने गुरू व आई वडीलांना दिले.

तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, शाळा समिती अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बाफना, सचिव तु. म. परदेशी,प्राचार्य धनाजी खरमाटे, रामदास भाऊसाहेब घावटे, प्रा.संदीप घावटे, डॉ.नितीन घावटे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या