शिरूर तालुक्यात रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

Image may contain: tree, plant, outdoor and natureशिरूर, ता. 12 जून 2019 : शिरूर तालुक्यात वादळी पावसाबरोबरच विविध ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विठ्ठलवाडी-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर दोन झाडे पडल्याने वाहतुकीसाठी रस्ता पूर्णता ठप्प झाला आहे. शिक्रापूर-मलठण रस्त्यावरही झाड पडले आहे. गेल्या दोन दिवसापासून वादळी पावसामुळे तळेगाव ढमढेरे-विठ्ठलवाडी रस्त्यालगत घुमे यांच्या पोल्ट्री फार्म जवळ बाभळीचे झाड एका बाजूस पूर्णता कलले होते. बाजूच्या लिंबाच्या झाडामुळे बाभळीचे झाड दोन दिवस तग धरून होते. मंगळवारी (ता. 11) सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर हे बाभळीचे झाड व लिंबाचे झाड रस्त्यावर कोसळले. तळेगाव ढमढेरे-विठ्ठलवाडी हा रस्ता कायम वर्दळीचा आहे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाला पूर्वसूचना दिल्याचे समजते. झाड कोसळल्याने या रस्त्याची वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे. अनेक वाहनचालकांना परतीचा प्रवास करून पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागला. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  कर्मचऱ्याना हे बाभळीचे झाड धोकादायक झाले असल्याचे कळविले होते. परंतु, कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने बाभळी बरोबर लिंबाचे ही झाड रस्त्यावर कोसळले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सतीश ढमढेरे यांनी दिली.

विठ्ठलवाडी, भोसे वस्ती परिसरात तीन दिवसापासून वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वीज वितरण विभागाने त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ललिता हरिश्चंद्र गवारे यांनी केली आहे.


शिरूर तालुक्याला वादळी पावसाने अक्षरशः झोडपले
Image may contain: tree, plant, sky, outdoor and natureशिरूर, ता. 11 जून 2019 : शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला असून, वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रविवारी (ता. 9) सायंकाळी झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. विविध ठिकाणी झाडे कोसळली होती. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत होते.

टाकळी भीमा परिसरात वादळी पावसाने घरांचे गोठ्याचे पत्रे उडाले तसेच केळी व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंचनामा करण्यात आला असून सुमारे १०  लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी सायंकाळी तळेगाव ढमढेरे, टाकळी भिमा, विठ्ठलवाडी परिसराला वादळी पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे टाकळी भिमा परिसरातील बाळोबाची वाडी,घोलप वस्ती,काळे वस्ती तसेच विठ्ठलवाडी येथील मिरगव्हाण वस्ती येथील नुकसानीचा पंचनामा गाव कामगार तलाठी गणेश घुमे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केला. यावेळी योगीराज धुमाळ, स्वप्निल भंडारे, प्रविण जगताप आदी उपस्थित होते. गणेश काशिनाथ सातव यांच्या पाच एकरातील केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले.साधारण चार हजार केळीची झाडे जमीनदोस्त झाली.यामुळे सुमारे चार लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सातव यांनी सांगितले.

ऐन उन्हाळ्यात केळीची बाग जगविण्यासाठी उसाच्या पिकाचे पाणी केळीला देऊन केळीची बाग फुलवली गेली,मात्र यामुळे ऊस जळाला  आता उसाचेही पीक गेले व केळीचेही पीक गेले अशी अवस्था सावंत या शेतकऱ्यांची झाली आहे. टाकळी भिमा हद्दीतील  बाळोबाच्या वाडीमध्ये जयराम सोन्याबापू वडघुले, पोपट विश्वनाथ मस्के, टाकळी भिमा येथील शशिकांत लक्ष्मण म्हस्के, रघुनंदन बापूराव वडघुले, शंकर दत्तात्रय काळे तर विठ्ठलवाडी-मिरगव्हाण येथील सोपान गेनभाऊ हंबीर यांच्या गोठ्या वरील व घरांवरील पत्रे उडाल्याने साधारण साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. जयसिंग बाबुराव धुमाळ यांच्या स्वच्छता गृहावरील पत्रे उडाले तर दत्तराज बबन धुमाळ यांची नऊ आंब्याची झाडे व दोन जांभळाची झाडे तसेच जयराम उडवले यांची आंबा पेरू नारळ यांची सात झाडे उन्मळून पडली. एका आंब्याच्या झाडाची मोठी फांदी तुटून सुमारे  एक हजार फुटांवर वेगाने जाऊन उसाच्या शेतात पडली तर जयराम सोन्याबापू वडघुले यांच्या घरावरील पत्रा साधारण दोन हजार फुटांवर उडून पडला. विठ्ठलवाडी-मिरगव्हाण येथील बेबी बबन कातोरे यांचा पाऊन एकर ऊस भुईसपाट झाल्याने साधारण सव्वा लाखाचे नुकसान झाले.

७ जून व  ९ जूनच्या वादळी पावसामुळे टाकळी भिमा, बाळोबाची वाडी, काळे वस्ती, घोलपवाडी, विठ्ठलवाडी-मिरगव्हाण येथे प्रत्यक्ष जाऊन नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ यांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. सदर अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती गणेश घुमे (गाव कामगार तलाठी, टाकळी भिमा, विठ्ठलवाडी) यांनी दिली.

Image may contain: 1 person, standing, plant, tree, sky, outdoor and natureतळेगाव ढमढेरे परिसरात जोरदार वादळी पावसाने झोडपले...
रविवारी सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या चमचमाटासह आलेल्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस आला. वाऱ्याची तीव्रता कमी झाल्यानंतर संततधार पाऊस पडू लागला त्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. वादळी पावसामुळे  काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले परिसरात ठिकठिकाणी झाडे पडली, उभी पिकेही भुईसपाट झाली. जोरदार वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णता खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या पावसाचा शेतीच्या मशागतीसाठी तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी मदत होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या