शिरूर तालुक्यातील व्हॉट्सऍप ग्रुपवर पाकिस्तानींचे आक्रमण

Image may contain: text
शिरूर, ता. 11 जून 2019 : शिरूर तालुक्यातील एका व्हॉट्सऍप ग्रुपवर पाकिस्तानी युवकांनी आक्रमण केले असून, ग्रुपवर अश्लिल व्हिडिओंचा भडिमार केला आहे. यामुळे ग्रुपमधील सदस्य घाबरून बाहेर पडले आहेत.

शिरूर तालुक्यातील युवकांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये पाकिस्तानी युवकांनी आक्रमण केल्यानंतर अश्लिल व्हिडिओंचा भडीमार केला. शिवाय, युवती असल्याचे भासवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रुपमध्ये खळबळ उडाली. काही जण तत्काळ ग्रुपमधून बाहेर पडले. ऍडमीनने हे क्रमांक काही वेळातच ग्रुपमधून हटवले. शिरूर तालुक्यातील काही युवकांना पाकिस्तानमधून व्हिडिओ कॉल येत असून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रुपच्या इनव्हाईट लिंकमधून पाकिस्तानी युवकांनी ग्रुपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे ग्रुपची लिंक शेअर करू नये.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जवानांना आपल्या जाळ्यात ओढले गेल्याची माहिती पुढे आली होती. पाकिस्तानमधून हनीट्रॅपचा प्रकार घडत आहे. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरही अनेकांना परदेशातून महिला लष्करी अधिकारी अथवा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून फ्रेण्ड रिक्वेस्ट येत आहेत.

पाकिस्तानी क्रमांक ग्रुपवर समाविष्ट झाल्यानंतर तत्काळ नजिकच्या पोलिस चौकीत अथवा सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी. शिवाय, परदेशातील कोणत्याही क्रमांकाशी संपर्क ठेवू नये व वैयक्तीक माहिती देऊ नये. सोशल मीडियाच्या माध्यमातून शत्रू राष्ट्र छुपे युद्ध खेळण्याचा हा प्रकार आहे, यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती सायबर कायद्याचे अभ्यासक व पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.

काय काळजी घ्यावी...
  • कोणत्याही अनोळखी क्रमांकांशी संपर्क ठेवू नये
  • ग्रुपमध्ये अनोळखी क्रमांक समाविष्ट झाल्यास तत्काळ काढून टाकावा
  • एखाद्या क्रमांकाबाबत संशय असल्यास सायबर क्राइम विभाग अथवा नजीकच्या पोलिसांकडे संपर्क साधावा.
  • फेसबुकवर खात्री केल्यानंतरच फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारा
  • परदेशातून आलेले व्हिडिओ कॉल टाळून ब्लॉक करा

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या