शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळणार पहिल्याच दिवशी पुस्तके

Image may contain: 2 people, people sittingशिरुर, ता.१५ जुन २०१९ (प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुक्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतच्या ४७ हजार १९२ विद्यार्थ्यांना २ लाख ६३ हजार ५३३ नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवार (दि.१७ जून) रोजी   केले जाणार असल्याची माहिती शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली.                      

शिरूर तालुक्यात मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. शिरूर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत  विद्यार्थी संख्या मराठी माध्यम ४७ हजार तर उर्दू माध्यमाची १९२ आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २ लाख ६२ हजार ३७० पुस्तके  तर उर्दू  माध्यमासाठी १ हजार १६३  पुस्तकांचे वाटप  करण्यात आले आहे. पुणे येथील बालभारती मधून  शिरूर तालुक्यासाठी  कारेगाव येथील  जिल्हा परिषद शाळेत  पुस्तके आणून  तालुक्यातील २६ केंद्रावर या पुस्तकांचे वाटप केंद्रप्रमुखांनी केंद्रातील  शाळांना केले असल्याचे विस्तार अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले.

शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार या वर्षीच्या  शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीचा पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम बदललेला आहे. मात्र बदललेली पाठ्यक्रमाची पुस्तकेही विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. शिरूर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून पुस्तके तालुकास्तरावरून सर्व केंद्र स्तरांवर उपलब्ध करून केंद्रनिहाय पुस्तक वाटपाचे चोख नियोजन विषय साधन व्यक्ती नागोराव चाटे, संतोष गावडे, बेबी तोडमल, प्रदीप देवकाते, विषय तज्ञ संदीप क्षीरसागर, संदिप गोरडे, स्नेहा खरबस, स्वाती कदम, विशेष शिक्षक विठ्ठल जवळकर, राहुल आवारी, रंजना गावडे ज्योती जाधव यांनी केले.                                            

जूनमध्ये शाळा भरल्यानंतर बहुतांशी शाळांमध्ये सुरुवातीचे तीन ते चार दिवस विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण अगदी कमी असते. मात्र चालू वर्षी पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार असल्याने विद्यार्थी आनंदाने पहिल्याच दिवशी शाळेत हजर राहतील. त्यामुळे शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या