तळेगाव ढमढेरेतील महाराष्ट्र बँकेत ग्राहकांची गैरसोय

तळेगाव ढमढेरे, ता. 25 जून 2019 (आकाश भोरडे): येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अपुऱ्या कर्मचार्‍यांमुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची संख्या मोठी असून, दैनंदिन व्यवहार करणारे व्यापारी व व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. शाखेत कर्मचारी कमी असल्याने उपलब्ध असणाऱ्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. व्यवहार करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कर्मचार्‍यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत ग्राहकांचे व्यवहार करावे लागतात. येथील शाखेत दररोज सुमारे सव्वा कोटी रुपयांची अर्थिक उलाढाल होते. बँकेत खातेदारांचे देणे व घेणे एकाच रोखपालाला करावे लागत असल्याने ग्राहकांना ताटकळत उभे रहावे लागते.

ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, व्यावसायिक, पतसंस्थेचे कर्मचारी आदींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेले दोन महिने हि समस्या पाहायला मिळत असल्याने संबंधीत प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या