संततधार पावसात वैष्णवांचा मेळा मार्गस्थ...

संत निंबराज पालखी सोहळा : ३५६ वे वर्ष
Image may contain: one or more people, crowd and outdoor
शिरूर, ता. 26 जून 2019 (प्रा. संदीप घावटे): लेकुरवाळ्या विठोबाच्या दर्शनासाठी 'याची देही याची डोळा' आपल्या भोळ्या भक्तित सामावून घेण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील हजारो भाविक वारकरी संततधार पावसात संत निंबराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. यावेळी वरुणराजाने ही हजेरी लावली.

ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषात तल्लीन होऊन देहभान विसरून नाचणारे वैष्णव, टाळ मृदुंगाचा गजर, विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थीनींचे लेझीम पथक, पावसाच्या सरी अशा भाक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या पांडुरंगाचे परमभक्त असणाऱ्या संत निंबराज महाराजांचा ३५६ वा पालखी सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.

आषाढी वारीचे वेध लागलेल्या भाविकांमुळे सकाळपासूनच हरीगजराने मंदीर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प चंद्रकांत दंडवते यांच्या हस्ते विणापूजन करून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मंदीराबाहेर आणली व उपस्थित भाविकांनी "पुंडलिका वर दे'चा गजर केला व पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. यावेळी देवदैठण, येवती, पाडळी, ढवळगाव, तर्डोबावाडी, गोलेगाव, शिरूर, बाभूळसर येथील वारकरी सहभागी झाले आहेत. वीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर पालखी पंढरपूरमध्ये पोहचते. मुक्कामाच्या ठिकाणी प्रवचन किर्तन सेवा केली जाते.

www.shirurtaluka.com सोबत बोलताना संत निंबराज देवस्थानचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दंडवते म्हणाले, पंढरपूर येथे काल्याच्या किर्तनाचा मान संत निंबराज पालखीचा असल्यामुळे गोपाळपूर येथे काल्याचे किर्तनाने सोहळ्याची सांगता होते.

सुरेश लोखंडे म्हणाले, 'आज असंख्य भाविकांच्या उपस्थितीत देवदैठण येथील संत निंबराज पालखी सोहळा पावसाच्या सरी झेलत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. पुर्वी पालखी निघताना हमखास पाऊस यायचा पण मध्यंतरी बऱ्याच वेळा पालखी पावसाविना गेली. यावर्षी पावसाच्या आगमनाने पालखी सोहळ्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या