पुण्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू (फोटो)

Image may contain: car and outdoor
पुणे, ता. 30 जून 2019 : शहरातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवार (ता. 28) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. शिवाय, रात्रभरही पाऊस सुरू होता. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरु आहे. त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या होत्या. परंतु, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली. आसपासचा परिसरातील जमीन खचली, ज्यामध्ये मजुरांच्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून,  हे सर्व मजूर बंगाल आणि बिहारमधून आलेले आहेत.

दुर्घटनेप्रकरणी कोंढवा पोलिसांनी शनिवारी अल्कॉन प्रमोटर्स अँड बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या कंपनीच्या अध्यक्ष-संचालकांसह चौदा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अल्कॉनच्या दोन्ही संचालकांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. सदोष मनुष्यवध (कलम ३०४), गुन्ह्यातील सहभाग (कलम ३४) अशा कलमान्वये या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अल्कॉन या बांधकाम कंपनीच्या पाच भागीदार बांधकाम व्यावसायिकांसह कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेचे तीन भागीदार बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम कंपन्यांमधील अन्य विभागांशी संबंधितांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

विवेक सुनील अग्रवाल आणि विपुल सुनील अग्रवाल अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अल्कॉनच्या वेबसाइटवरील माहितीनुसार दोघेही संचालक आहेत. विवेक आर्किटेक्‍ट आणि विपुल एल. एल. बी. असल्याचे वेबसाइटवर म्हटले आहे.

मृतांची अधिकृत यादी :
1) आलोक शर्मा - 28 वर्षे
2) मोहन शर्मा - 24 वर्षे
3) अमन शर्मा - 19 वर्षे
4) अजितकुमार शर्मा - 7 वर्षे
5) रवि शर्मा -19 वर्षे
6) लक्ष्मीकांत सहानी - 33 वर्षे
7) अवदेश सिंह - 32 वर्षे
8) सुनील सिंग - 35 वर्षे
9) ओवी दास - 2 वर्षे 
10) सोनाली दास - 6 वर्षे 
11) भिमा दास - 28 वर्षे
12) संगीता देवी - 26 वर्षे
13) रावलकुमार शर्मा - 5 वर्षे
14) निवा देवी - 30 वर्षे
15) दिपरंजन शर्मा

मृतदेह बिहारला विमानाने पाठविणार...
कोंढवा येथील दुर्घटनेतील मजुरांचे मृतदेह विमानाने बिहारला पाठविण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री व रविवारी दुपारपर्यंत उपलब्ध होणाऱ्या विमानांनी ते बिहारला पाठविण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सर्व मृतदेह ससूनमध्ये ठेवण्यात आल्याचे कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या