Facebook, WhatsApp चालेना अन् काहीच कळेना...

No photo description available.
शिरूर, ता. 4 जुलै 2019: सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेले Facebook, WhatsApp आणि Instagram बुधवारी (ता. 3) जगभरात डाऊन झाले होते, यामुळे नेटिझन्सला काय करावे कळेनासे झाले होते.

नेटिझन्सना व्हॉट्सअॅप वापरण्यात अडचणी येत होत्या. व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचे अनेकांनी ट्विटरवरून सांगितले. Facebook, WhatsApp आणि Instagram बंद झाल्यामुळे अनेकांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी ट्विटरकडे मोर्चा वळविला. भारतासह युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या देशांत Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडथळे येत होते. मलेशिया, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्येही युजर्सना फेसबुक आणि WhatsApp वापरण्यात अडथळे येत आहेत.

जगभरातल्या कोट्यवधी नेटिझन्सना छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्याबरोबरच डाऊनलोडसुद्धा करता येत नव्हते. यामुळे काय करावे, हे कळेनासे झाले होते. अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांबरोबर इंटरनेट व सोशल मीडिया ही मुलभूत गरज झाली आहे. सोशल मीडिया ठप्प झाल्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

दरम्यान, काही ठिकाणी तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपची खिल्ली उडवली जात आहे. तिन्ही प्लॅटफॉर्मवर लोकांना अडचणी येत असल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या सगळ्याबाबत आता फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या लाखो युजर्सना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असं फेसबुकने म्हटलं आहे. बुधवारी अनेक लोकांना मग ते व्यवसाय किंवा नोकरी क्षेत्रातले असोत किंवा इतर क्षेत्रातले त्यांना फेसबुकचा वेग मंदावलेला जाणवत होता. ते जेव्हा इमेजेस किंवा व्हिडिओ पाठवत होते त्यावेळी हा वेग मंदावला होता. मोबाईलवरच्या फेसबुक अॅपला अडचणी येत होत्या. मात्र आम्ही तेव्हापासूनच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आता ही समस्या पूर्णपणे सोडवली आहे. बुधवारपासून जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं फेसबुकने म्हटलं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप या तिन्हीचा वेग बुधवारी दुपारपासून मंदावला होता. दुपारी २.४९ पासून ही अडचण जाणवू लागली होती. व्हिडिओ पोस्ट न होणे, इमेज डाऊनलोड न होणे या समस्या भेडसावत होत्या. यामागचे कारणही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता या सगळ्याबाबत फेसबुकने माफी मागितली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या