डोळ्यात मिरचीपूड जाऊनही त्याने दाखविले धैर्य...
मांडवगण फराटा,ता.२२ जुलै २०१९(प्रतिनीधी) : रात्रीच्या वेळेस अज्ञातस्थळी गाठून घरी जाणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करून पैसे लुबाडून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र डोळ्यात मिरची गेली असतानाही तो धैर्याने संकटाला सामोरे गेल्याने चोरट्यांचा लुटिचा डाव हाणून पाडला.
याबाबत सविस्तर असे की, मांडवगण फराटा येथील सूर्यकांत बाळासाहेब धुमाळ(वय.३६)हे मांडवगण फराटा या गावात व्यवसाय करतात.नेहमीप्रमाणे ते दिवसभरातील काम आटोपून रात्रीच्या दहाच्या सुमारास आपले दुकान बंद केले.व दुचाकीवर घरी चालले होते.मांडवगण सोडल्यानंतर काही अंतरावर गेले असताना मागून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी हाक मारून धुमाळ यांचे लक्ष विचलित केले.यावेळी मागून आलेल्या दुचाकीवरील तिघाव्यक्तींपैकी एकाने अचानक धुमाळ यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली.तर एकाने त्यांच्या तोंडावर फटका मारला.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही क्षण धुमाळ यांना काहीच सुचले नाही.परंतु प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत डोळ्यात मिरचीपूड गेली असताना ही धुमाळ यांनी आपली दुचाकी कशाचीही पर्वा न करता जोरात पळविली.सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत त्याच अवस्थेत रस्ता दिसत नसतानाही त्यांनी दुचाकी चालवली.त्यानंतर घरी जाताच हा सगळा प्रकार घरच्या कुटुंबीयांना सांगितला.त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी धुमाळ यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याखाली गालाजवळ चांगला मार लागला आहे.
दरम्यान मांडवगण फराटा पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेतला.परंतु तोपर्यंत हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते.अशाचप्रकारे या चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस मिरचीपूड टाकून लुटण्याचा नवा प्रकार या भागात सुरू केला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे असे मत मांडवगण फराटा औटपोस्ट चे जमादार आबासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले असून नागरिकांनी घाबरून न जाता अनोळखी व्यक्ती व संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली निदर्शनास आल्यास मांडवगण फराटा पोलीस चौकीशी तत्काळ संपर्क साधावा.
या झालेल्या घटनेमुळे अनेक व्यावसायिक भितीच्या छायेखाली वावरत आहेत.ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावांत जेथे सीसीटीव्ही कँँमेरे बसविले आहेत अजून गावातील प्रमुख रस्त्यांवर बसविले गेले तर अशा घटनांना पायबंद घालता येऊ शकेल.