'आमच्या युवा नेत्याला बाजार समितीवर सभापती करा'

Image may contain: 1 person, closeupकेंदूर, ता. 25 जुलै 2019 (विशाल वर्पे): केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटातील आमच्या युवा नेत्याला बाजार समितीवर सभापती करा अशी मागणी वेळोवेळी स्थानिक राष्ट्रवादीच्या युवकांसह जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यातच याच गटातील आणि शिरूर - हवेली मतदार संघातील पिंपळे जगतापच्या ग्रामपंचायतीने देखील लेखी स्वरूपात मागणी वळसे पाटील यांच्याकडे शंकर जांभळकर यांना सभापती करण्याची मागणी केली आहे.

मे २०१७ मध्ये झालेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या करंदीचे शंकर जांभळकर यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. याच जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान पत्नी दिव्या जांभळकर यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र त्यावेळी पाबळच्या सविता बगाटे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर तेव्हाही जांभळकर यांनी बगाटे यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली आणि बगाटे या निवडणूनही आल्या त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही डॉ. अमोल कोल्हे यांना संपूर्ण जिल्हा परिषद गटातून ५ हजार मतांची आघाडी मिळाली. जांभळकर यांचे गाव असलेल्या खासदार सांसद आदर्श ग्राम योजना करंदीतूनही डॉ. कोल्हे यांना ७३२ मतांची आघाडी दिल्यानंतर करंदी ग्रामस्थांसह गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा पक्षाचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जांभळकर यांना सभापती पदी संधी दयावी यासाठी साकडे घातले. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी पिंपळे जगताप येथे झालेल्या एका कार्यक्रमात पिंपळे जगताप ग्रामपंचायतच्या लेटरवर लेखी स्वरूपात आमच्या गावाने बाजार समितीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय. जिल्हा परिषद गटातून डॉ. कोल्हे यांना ५ हजार मतांची आघाडी दिली त्यामुळे आमच्या गटातील समितीचे युवा संचालक शंकर जांभळकर यांना सभापती करा, अशा मागणीचे पत्र वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्यावेळी वळसे पाटील यांनी योग्य कार्यकर्त्याला योग्यवेळी संधी पक्ष संधी देईल अशी भूमिका स्पष्ट केली. सभापती शशिकांत दासगुडे यांच्यानंतर जांभळकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. शिरूरच्या आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या ३९ गावांतून आता शंकर जांभळकर यांचे नाव पुढे येत आहे.

शिरूर बाजार समितीवर सभापती शशिकांत दासगुडे हे माजी आमदार अशोक पवार यांच्या मतदार संघातील आहेत. आता यावेळी आंबेगावला जोडलेल्या ३९ गावातील संचालकाला संधी मिळणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्याचबरोबर जांभळकर हे उच्च शिक्षित युवा संचालक आहेत. पक्षातील जेष्ठ नेते आणि संपूर्ण संचालक मंडळाशी असलेले चांगले संबंध हे त्यांची जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशोक पवार यांच्या मर्जीतले दासगुडे हे जांभळकर यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा देणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शंकर जांभळकर यांना विचारले असता ते म्हणाले, 'संधी मिळाली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करणार आहे. मी वळसे पाटील, अशोक पवार, पोपटराव गावडे आणि प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीवर निवडून आलो आहे, त्यामुळे आगामी काळात मी सभापती होणं हे सर्व त्यांच्याच मर्जीवर आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या