शिरूरच्या पुर्व भागात राष्ट्रवादीला खिंडार... (Video)

Image may contain: 11 people, people smiling, people standing
शिरूर, ता. 3 ऑगस्ट 2019: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कारभाराबद्दल जाहिर वाच्यता करून बंडाचे निशान फडकावलेले राष्ट्रवादीचे संचालक सुधीर फराटे हे शुक्रवारी (ता. 2) 'मातोश्री'वर शिवबंधनात अडकले. यामुळे शिरूर तालुक्यातील पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असल्याचे जाहीर झाले आहे.

जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिरूरमधील मांडवगण सोसायटीचे संचालक रावसाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य अशोक जगताप, मच्छिंद्र जाधव, आप्पासाहेब फराटे, कृष्णराव फराटे, सामिर फराटे, निलेश इथापे, कैलास फराटे, रत्नाकर फराटे आदीं कार्यकर्तेनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये खासदार आढळराव पाटील यांनी जनसंपर्क वाढवला असून, पक्षबांधणीचे काम जोरात सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये आपले स्थान भक्कम करत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील अनेक दिग्गज मंडळी शिवसेनेकडे वळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली कटके हे शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असून, फराटे यांच्या प्रक्ष प्रवेशाने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे. तर माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षवाढीसाठी स्वतःला झोकून दिल्याचे व शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्याचे काम योग्य दिशेने सुरू केले आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान, आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली 21 पैकी 21 अशी 4 वर्षापूर्वी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर एकहाती राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र, मागील 6 महिन्यांपासून संचालक सुधीर फराटे यांनी कारखान्याच्या कारभारात व आर्थिक व्यवहारात अनियमिता होत आहे व होत असलेल्या गैरकारभाराला कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार जबाबदार आहेत, असा जाहीर आरोप करून तालुक्याचे राजकारण हालविले होते. फराटे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा परिसरात होत्या. अखेर, त्यांनी मुंबई येथील मातोश्रीवर शिवसेनापक्षप्रमुख उध्वव ठाकरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितती शिवसेनेत प्रवेश केला. फराटे यांच्या प्रवेशामुळे तालुक्याच्या पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून, यामुळे शिरूर तालुक्यात शिवसेनेची पूर्व भागात ताकद वाढणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या