रांजणगावच्या तत्कालीन मंडल अधिकाऱ्यास अटक

Image may contain: one or more people and phone
शिरूर, ता. 4 ऑगस्ट 2019: टेमघर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनींची बनावट कागदपत्रे बनवून त्याचे परस्पर हस्तांतर व विक्री करण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या रांजणगावच्या तत्कालीन मंडल अधिकाऱ्यास समर्थ पोलिसांनी बुधवारी (ता. 31) रात्री अटक केली. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बळीराम खंडूजी कड असे अटक केलेल्या तत्कालीन मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली नामदेव गरड (वय 42, रा. हडपसर), सुभाष कारभारी नळकांडे (रा. बुरुंजवाडी, ता शिरूर), शिरूर तहसील कार्यालयातील पुनर्वसन लिपिक रमेश वाल्मीकी, कासारी गावचे तलाठी सचिन देवप्पा काळेल यांना यापूर्वीच समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. तर, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील लिपिक चंद्रशेखर मुरलीधर ढवळे हा अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेमघर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना शासनातर्फे जमीन देण्यात आली होती. याप्रकरणी कड, गरड या अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांनी संगनमत केले होते. ढवळे याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे बनावट आदेश तयार केले, तर वाल्मीकीने शासनाने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनीचा भोगवटा वर्ग बदलसाठीचे अर्ज बनविले. त्यानंतर गरड यांनी त्यांना अधिकार नसतानाही उपजिल्हाधिऱ्यांच्या अधिकाराचा शेरा दिला. काळेल याने फेरफार नोंदणीवर नोंदी घेतल्या, त्या नोंदी तत्कालीन मंडलाधिकारी कड याने कोणतीही पडताळणी न करता प्रमाणित केल्या. बनावट कागदपत्रे बनवून प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी हस्तांतरित करून त्याच जमिनी सर्वसामान्य नागरिकांना विकण्यात आल्या. जमिनीच्या वाटपामधील अनियमिततता निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयाने दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समर्थ पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी काही आरोपींना अटक केली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या