शिरूर तालुका धावला पूरग्रस्तांच्या मदतीला...

शिरूर, ता. 11 ऑगस्ट 2019: कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिरूर तालुका धावून आला आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मदत करतानाचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. तातडीची मदत म्हणून विविध खाद्य पदार्थ व इतर आवश्‍यक साहित्याचे टेम्पो भरून रवाना होत आहेत.

शिरूर तालुक्‍यातून गव्हाचे पीठ मोठ्या प्रमाणात जमा केले होते. वडगाव रासाई येथे सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक महिलांनी रात्रभर जागून सुमारे चाळीस हजार चपात्या व 25 हजार पुऱ्या बनविल्या. शेंगदाणा चटणी, लोणचे व चपाती किंवा पुरी असे पॅकेट तयार करून हे पदार्थ शनिवारी सकाळी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले.

5 हजार भाकरी, चिवडा, बिस्किटे...
शिरूर तालुक्‍यातील 39 गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 5 हजार भाकरी, चिवडा, बिस्किटे, वेफर्स, चटणी, तांदूळ व खाद्यपदार्थ आणि आवश्‍यक इतर साहित्यांचा समावेश आहे. तसेच रांजणगावातील आराध्य फौंडेशनतर्फे चपात्या व चटणी पाठविण्यात आली. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी सदस्य शेखर पाचुंदकर, पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती प्रकाश पवार, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर, आत्माराम खेडकर, शिवाजीराव शेळके, केरूभाऊ कुटे, अमोल जगताप, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. आणखी दोन दिवसांनी 10 हजार भाकरी, खाद्यपदार्थ व जीवनावश्‍यक वस्तू पाठविण्यात येणार असल्याचे श्री पाचुंदकर यांनी यावेळी सांगितले. पूराच्या पाण्यात बोट उलटून पाण्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिरूरमधून 3 ट्रक धान्य व निधी...
पूरग्रस्तांसाठी शिरूरकरांनी रोख रक्कम व जीवनावश्‍यक वस्तूंच्या रूपाने मदतीचा मोठा हात दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मदत गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला. जमा झालेला निधी व तीन ट्रक धान्य व साहित्य पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले. शहराच्या विविध भागांत फिरून पूरग्रस्तांसाठी रोख मदत व जीवनावश्‍यक वस्तू जमा केल्या. त्याला मोठ्या व्यापाऱ्यांसह हातगाडीवाले, पथारीवाले, रिक्षाचालक, फळविक्रेत्या महिला व विविध संस्था- संघटनांनीही प्रतिसाद दिला. सुमारे 75 हजार रुपये रोख स्वरूपात जमा झाले. शिवाय धान्य, इतर किराणा, बिस्कीट पुडे, फळे, कपडे, टूथपेस्ट व इतर जीवनावश्‍यक वस्तू मोठ्या प्रमाणात जमा झाले.

सणसवाडी येथे भैरवनाथ मंदिरात साहित्य जमा...
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक जाणिवेतून सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अन्नधान्य व इतर साहित्य संकलित करून रवाना केले. सणसवाडी ग्रामस्थांनी अन्नधान्य तसेच फरसाण, बिस्कीट आदी खाद्यपदार्थ स्वरूपात सणसवाडी येथे भैरवनाथ मंदिरात जमा करुन कोल्हापूरकडे रवाना केले. पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका नवनाथ हरगुडे यांनी पुढाकार घेत दानशुरांना मदतीचे आवाहन केले होते. यासाठी माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे, जिजामाता बँकेचे संचालक पंडीत आप्पा दरेकर, माजी सरपंच गिता गोरक्ष भुजबळ, माजी उपसरपंच शिवाजी दरेकर, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, गाव कारभारी सोमनाथ दरेकर व ग्रामस्थांनी मदत देऊन इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील विविध गावांमधून मदत गोळा केली जात असून, अनेकजण मदतीसाठी सरसावले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या