हालाखीची परिस्थिती, सततचे अपयश, अखेर यश...

Image may contain: 3 people, people standing and beardशिरूर, ता. 20 ऑगस्ट 2019: कुटुंबाची हालाखीची परिस्थिती, परिक्षेत सततचे अपयश, पण शेवटपर्यंत हार माणलीच नाही. प्रयत्न चालू ठेवले अन् यश खेचून आणले. यशाला गवसणी घालणाऱयाचे नाव रवींद्र बिभीषण ढवळे. त्यांनी सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.

भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देताही सीएची पदवी मिळवली असून, त्यांचे यश हे अनेकांना प्रेरणादायी आहे. "सीए'सह एकूण 17 परीक्षा दिलेल्या रवींद्रकडे तब्बल 12 रिझल्ट फेल झालेले असून, पाच रिझल्ट पास झालेले आहेत.

शिरूर शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह राहतो. रवींद्रची आई वैशाली व वडील बिभीषण हे दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन, तो शिरूर शहर व परिसरातील आठवडे बाजारात विक्री करण्याचा गेल्या 15 वर्षांपासून त्यांचा व्यवसाय आहे. रवींद्र व सागर हे दोघे त्यांना व्यवसायात मदत करतात.

सीएच्या शिक्षणासाठी गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहावे लागत असल्याने रवींद्रची मदत मिळत नसली; तरी त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडू नये, म्हणून हे कुटुंब चार बाजारांऐवजी सात बाजार करून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाला थोडी मुरड घालून त्याला पैसे पाठवीत होते. रवींद्रचे चौथीपर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते दहावी त्याने शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत केले. येथील सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवी मिळविल्यानंतर, त्याने 2010 मध्ये "सीए'ची परीक्षा दिली. पाच वेळा अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही व परिश्रमपूर्वक यंदा तो पास झाला. या दरम्यान, त्याने जीडीसी ऍण्ड ए, डीटीएल या डिग्री मिळविल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या