पेट्रोल पंपाची रक्कम घेऊन पसार झालेला आरोपी गजाआड

Image may contain: one or more people
शिक्रापूर, ता. 23 ऑगस्ट 2019: सणसवाडी येथील पेट्रोल पंपावरून ७० हजार रुपये चोरून पसार झालेल्या पंपावरील कामगारास शिक्रापूर पोलिसांनी उस्मानाबाद येथे अटक करून ताब्यात घेतले आहे.

सणसवाडी (ता. शिरूर) येथे समीर भुजबळ यांच्या वरद पेट्रोलियम या पेट्रोलपंपावर ५ जून २०१९ रोजी विकास यादव व सुधीर भवरिया हे दोघे रात्रपाळीमध्ये काम करत होते. पेट्रोल पंपावरील रक्कम विकास यादव याचेकडे होती. मात्र, रात्री अकरा वाजल्यानंतर विकास हा पेट्रोलपंपामध्ये कोठेही दिसत नसल्याने कामगार सुधीर भवरिया याने समीर भुजबळ यांना फोनवर माहिती दिली. त्यांनतर भुजबळ हे पेट्रोलपंपावर आले आणि त्यांनी सर्वत्र चौकशी केली. परंतु, त्यांना पेट्रोल पंपावरील कामगार विकास यादव हा कोठेही दिसला नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली कि विकास हा पेट्रोल पंपावरील सत्तर हजार रुपये रक्कम घेऊन पळून गेला. त्यानंतर समीर उत्तम भुजबळ (रा. गणेशनगर, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी विकास कचरण यादव (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे. मूळ रा. पिंपळगाव, ता. वाशी जि. उस्मानाबाद) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. विकास यादव चोरी करून फरार झाला होता त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

संशयीत आरोपी उस्मानाबाद परिसरात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संजय ढावरे, निखील रावडे यांनी उस्मानाबाद येथे जाऊन विकास यादव यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. संशयीत आरोपी विकास यादव यास अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय ढावरे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या