'त्या' युवकाच्या खुनाचा अठ्ठेचाळीस तासात छडा

No photo description available.तळेगाव ढमढेरे,ता.३१ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथे बुधवार (दि.२८ ऑगस्ट) रोजी खून करण्यात आलेल्या रुपेश जगतराव वाल्हे या युवकाच्या खुनाचा छडा लावण्यात शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले असून पोलिसांनी खून करून फरार झालेल्या आरोपीला चक्क अठ्ठेचाळीस तासात अटक करण्याची कामगिरी केली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे रुपेश जगतराव वाल्हे (वय २९, रा. किरकटवाडी, ता. हवेली, जि. पुणे) या युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेला होता. रुपेशचा खून झाला त्यावेळी खुनाबाबत कोणताही पुरावा मागे राहिलेला नव्हता, त्यामुळे सदर खुनाचा छडा लावणे पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झालेले होते. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना रुपेश याचा खून त्याच्याच मित्राने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

परंतु रुपेशचा खून करणारा संशयीत केशव दोरगे हा फरार झाला होता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते, आरोपी दोरगेचा शोध पोलीस घेत असताना केशव दोरगे हा आज शुक्रवार(दि.३० ऑगस्ट) रोजी पहाटेच्या सुमारास शिक्रापूर येथील चौकातून बसमधून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शिक्रापूर चाकण चौकात सापळा रचून आरोपी केशव दोरगे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केशव रामचंद्र दोरगे (रा. जगताप वस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ राहणार अनुराज कारखान्यासमोर, यवत, ता. दौंड, जि. पुणे) यास अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रुपेश वाल्हेचा खून केला असून रुपेश हा दोरगे याच्या घरी कधीकधी येत होता तसेच रुपेश याने आरोपी दोरगे याचे पैसे चोरले असल्याचा संशय त्याला होता त्यामुळे केशव दोरगे याने रुपेश वाल्हे याला तळेगाव ढमढेरे येथील बाजार मैदानाच्या परिसरात आणले आणि त्यावेळी त्याला दारू पाजली आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याचे सांगितले. आज शिक्रापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा करणारा केशव दोरगे यास अटक करत शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्रापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या