Video : वाळूमाफिया महसूल खात्यालाही नाही जुमानत

Image may contain: sky, ocean, boat, tree, outdoor, water and nature
निमोणे, ता. 5 ऑक्टोबर 2019 : कुऱ्हाडवाडी (ता. शिरुर) येथील घोड धरणाच्या नदीपात्रात बेसुमार "वाळूउपसा" सुरूच असून "वाळूमाफिया" महसूल खात्याला जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. अवैध वाळूउपसा संदर्भात बातम्या आल्यावर दोन दिवस वाळूउपसा बंद होता. परंतु, पुन्हा "वाळूमाफिया" सक्रिय झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड यांनी केली आहे.

शिरुर तालुक्यात कोणत्याही वाळूच्या भुखंडाचा लिलाव झालेला नाही. परंतु, तरीही शिरुर तालुक्यातील घोड, भीमा या नदीपात्रात मोठया प्रमाणात अवैधरीत्या वाळूउपसा चालू आहे. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्राची अक्षरशः चाळण झालेली आहे. शिरुर तालुक्यातील रस्त्यांची वाळू वाहतुकीमुळे खड्डे पडुन दुरावस्था झालेली आहे. तरीही पैशाच्या हव्यासापोटी "वाळूमाफिया" थांबायला तयार नाहीत. तसेच महसुल प्रशासनानेअनेकवेळा कारवाई करुनही अवैध वाळू उपसा थांबत नाही. त्यामुळे भविष्यात अनेक मोठया संकटांना सामोरं जाण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर येणार आहे.
Image may contain: sky, tree, plant, outdoor, water and nature
वाळूसम्राट-महसूलच्या कर्मचाऱयांमध्ये तडजोड?
शिरुर, ता. 3 ऑक्टोबर 2019 : कुऱ्हाडवाडी येथील घोड धरणात अवैधरीत्या चालू असलेल्या बेसुमार "वाळूउपशा" बाबत www.shirurtaluka.com वर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महसुल खात्याने अद्याप "वाळूसम्राटांवर" कोणतीच कारवाई केली नसून महसुलचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी यात काही आर्थिक तडजोड तर करत नाहीत चर्चा या परिसरात सुरु झाली आहे.

सध्या घोडधरण १०० टक्के भरलेले आहे. त्यामुळे निमोणे येथील पिंपळाचीवाडी, कुऱ्हाडवाडी येथे मोठया प्रमाणात "वाळूउपसा" चालू असून अंदाजे २५ ते ३० बोटींच्या साहयाने रोज हजारो ब्रास वाळुची विक्री या परिसरात होत आहे. त्यात "वाळूमाफियांना" लाखो रुपये मिळत असून भविष्यात या ठिकाणी वाळूसाठी मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. येथील एक स्थानिक राजकीय पुढारी यात सामील आहे.तो भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांचा समर्थक असल्याने स्थानिक प्रशासन कारवाई करत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

सध्या वाळूचा साठा याच पुढाऱ्याच्या जमिनीत करण्यात येत असून तिथून पुढं वाळूची विक्री करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी "वाळूउपशावर" कारवाई साठी आलेल्या अधिकाऱ्यांची या राजकिय नेत्याच्या बंगल्यावर जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे अधिकारी कारवाई न करताच परत गेले असून यात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यता आहे.

याबाबत शिंदोडी RTI कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड यांनी तहसीलदार लैला शेख यांनी वाळूमाफीया वर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


वाळूसम्राटांकडून अवैध वाळूउपसा करण्याचा सपाटा

Image may contain: sky, ocean, outdoor, water and nature
शिरुर, ता. 1 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू असून, प्रशासन निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने आणि आचारसंहिता लागू असल्याने शिरुर तालुक्यातील "वाळूसम्राटांनी" घोडनदीच्या पात्रातून रात्रंदिवस अवैध वाळूउपसा करण्याचा सपाटाच लावला आहे.

कुऱ्हाडवाडी (ता.शिरुर) येथील येथील घोडनदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अंदाजे २५ यांत्रिक बोटींच्या मदतीने अवैधरीत्या बेसुमार वाळूउपसा चालू असून रात्रीच्या वेळेस ट्रकच्या साहयाने हि वाळू वाहतूक केली जात आहे. आधीच पाऊसाने उखडलेले झालेले डांबरी रस्ते वाळू वाहतूकीमुळे अजूनच खराब झाले आहेत. या वाळूउपशामुळे भविष्यात घोडधरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना गंभीर समस्येला तोंड दयावे लागणार आहे.

घोड नदीच्या पात्रात दाणेवाडी, गोलेगाव, चिंचणी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासुन बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. परंतु, आता त्या ठिकाणी वाळू सापडत नसल्याने आता वाळूसम्राटांनी सध्या आपला मोर्चा निमोणे येथील पिंपळाचीवाडी आणि कुऱ्हाडवाडी या ठिकाणी वळवला आहे. इथल्या घोड धरणाच्या कडेला जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागेत वाळूचा साठा करुन तो रात्रीच्या वेळेस ट्रकच्या साहयाने इतरत्र पाठवला जात आहे.

अनेकवेळा महसूल विभागाने वाळूउपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या साह्याने उडवून दिल्या. परंतु "वाळूसम्राट" मात्र कोणालाच जुमानत नसल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कुऱ्हाडवाडी येथे वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील लहान मुलांना या वाहनांमुळे त्रास होत असून, या रस्त्यावर गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

कुऱ्हाडवाडी येथे एका राजकीय संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष असलेल्या राजकीय नेत्याची घोड धरणाच्या कडेला जमीन असून हा राजकीय नेता स्वतःच्या जमिनीत वाळूचा स्टोक करत असुन प्रत्येक वाळूच्या ट्रक मागे ठराविक रक्कम तो वसुल करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याच राजकीय नेत्याच्या पाठबळावर कुऱ्हाडवाडी येथे रात्रंदिवस अवैध वाळुउपसा चालू असल्याचे काही स्थानिक ग्रामस्थांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. काही दिवसांपुर्वी पिंपळाचीवाडी येथे वाळूउपसा करणाऱ्या बोटीं जेव्हा जाळण्यात आल्या त्यावेळेस ह्याच राजकीय नेत्याने पुढाकार घेऊन वाळुउपसा करणाऱ्या बोटी फोडल्या होत्या.

याबाबत शिंदोडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड म्हणाले, 'शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असताना तसेच नदी पात्राची अक्षरशः चाळण होत असताना महसूल खात्याचे वरीष्ठ अधिकारी याकडे जाणीवपुर्वक का..? कानाडोळा करत आहेत. महसूल खाते आणि वाळूसम्राट यांचे साटलोट असून महसूल खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी यात लवकरात लवकर लक्ष घालावे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या