शिक्रापूर येथून विवाहित महिला व तरुणी बेपत्ता

शिक्रापूर, ता. 13 ऑक्टोबर 2019: शिक्रापूर परिसरात सातत्याने विविध वयोगटातील व्यक्ती बेपत्ता होत असल्याने तसेच नुकताच बेपत्ता झालेला एका व्यावसायिकाचा मृतदेह घातपात झालेला असावा अशा संशयास्पद अवस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच शिक्रापूर येथून आपट्याची पाने विकायला आलेली विवाहित महिला तर दुसऱ्या एका घटनेत १९ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. विविध वयोगटातील व्यक्ती बेपत्ता होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकात दसऱ्याच्या सणासाठी लागणारी आपट्याची पाने विक्रीसाठी आलेली महिला बेपत्ता झाली असल्याची घटना घडली असून, बेपत्ता महिलेच्या पतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार मुखई येथील अंकल भोसले व पूजा भोसले हे दोघे पती पत्नी दसऱ्याच्या सणासाठी वापरण्यात येणारी आपट्याची पाने विक्री करण्यासाठी सात ऑक्टोबर रोजी शिक्रापूर येथील पाबळ चौकामध्ये आलेले होते. त्यावेळी पूजा हि महिला पुढील चौकात आपट्याची पाने विक्रीसाठी बसण्यास जागा पाहण्यासाठी गेली. त्यांनतर ती परत आलीच नाही. त्यानंतर तिच्या पतीने तिचा सर्वत्र तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता कोठेही मिळून आली नाही. याबाबत बेपत्ता पूजा भोसले यांचे पती अंकल रोहिदास भोसले (रा. मुखई, ता. शिरूर, जी. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. बेपत्ता पूजा हिचे वर्णन उंची पाच फुट दोन इंच, गोल चेहरा, बसके नाक, काळे केस, गळ्यात दोन मण्यांचे मंगळसूत्र, कानात फुले तर अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व निळ्या रंगाची लेगीन ड्रेस असे आहे.

दुसऱ्या एका घटनेत शिक्रापूर येथून १९ वर्षीय युवती अचानकपणे घरातून बाहेर गेली आणि बेपत्ता झाली असल्याची घटना नुकतीच घडली आहे. बेपत्ता युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शिक्रापूर येथील येथे राहणारी पूजा स्वामी हि मुलगी तिची आई कामाला गेल्यानंतर एकटीच घरी होती, सायंकाळी पुजाची आई घरी आल्यानंतर तिला घरात मुलगी दिसली नाही म्हणून तिच्या आई वडिलांनी सर्वत्र नातेवाईकांकडे तसेच इतरत्र शोध घेतला असता कोठेही मिळून आली नाही. याबाबत बेपत्ता पूजाची आई शिवकांता चंद्रकांत स्वामी (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जी. पुणे; मूळ रा. सुपा, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. बेपत्ता पूजा स्वामी हिचे वर्णन रंग सावळा, उंची पाच फुट दोन इंच, गोल चेहरा, सरळ नाक, काळे डोळे तर अंगात निळ्या रंगाचा टीशर्ट व नाईट प्यांट असा ड्रेस असे वर्णन आहे. याबाबत कोणासही काही माहित असल्यास अथवा कोठे आढळल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९८५०५८६३३७ तसेच ०२१३७२८६३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल जगताप हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या