उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद; उत्सुकता शिगेला...

Image may contain: phone
शिरूर, ता. २2 ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) : शिरुर-हवेली विधानसभेत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून, इच्छुक उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. गुरुवारी (ता. 24) मतमोजणी होणार असून, पुढे काय होणार याकडे उत्सुकता लागली आहे.

शिरुर तालुक्यात गेले तीन दिवस  संततधार सुरु होती. माञ पावसाने अखेर सोमवार (दि.२१) रोजी सकाळी सहा वाजलेपासुन उघडिप दिल्याने शिरुर शहर व तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. राञी उशिरापर्यंत मतदानासाठी नागरिकांनी उत्सफुर्तपणे घराबाहेर पडुन मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पावसाने उघडिप दिल्याने सर्वच ठिकाणी मतदानामध्ये मोठा उत्साह दिसुन येत होता. सकाळी काहीसे ढगाळ वातावरण असताना अशा  वातावरणात मतदानाला सात वाजता  सुरुवात झाली.सुरुवातीच्या दोन तासांत काहीशा संथगतीने चाललेल्या मतदानाने सकाळी नउ नंतर वेग घेतला.नउ वाजेपर्यंत ३.७६ टक्के इतकेच मतदान झाले होते.तर सकाळी अकरा वाजेपर्यंत १४.५० टक्के मतदान झाले होते.दुपारी एक वाजता ३० टक्के तर तीन वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले.

शिरुर शहर व पंचक्रोशीतील रामलिंग, अण्णापुर, सरदवाडी, कर्डेलवाडी, तर्डोबाची वाडी, गोलेगाव, करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी आदी ठिकाणी सकाळी अकरानंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदानाचा वेग वाढला. शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांनी तर्डोबाची वाडी या त्यांच्या गावी दुपारी दिड वाजता मतदानासाठी रांगेत उभे राहुन मतदानाचा हक्क बजावला.तर राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांनी सकाळी वडगाव रासाई येथे पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार व कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.शिरुर येथील अनेक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअर ची व्यवस्था करण्यात आली होती.तर व्हिलचेअर मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी अनेक वृद्ध,दिव्यांग यांना या व्हिलचेअर च्या साहाय्याने मतदानासाठी नेण्यात आले.तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मतदान केंद्रावर तृतीयपंथीय भगिनींनी संदिप गि-हे व त्यांच्या सहकार्याने उत्सफुर्तपणे मतदान केले तसेच इतरांनाही मतदान करण्यासाठी आवाहन केले.अनेक मतदान केंद्रावर दुपारी एक नंतर लांबच लांब रांगा दिसुन येत होत्या. ठिकठिकाणी मतदान केंद्रांबाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना स्लिपा देणे तसेच मतदान केंद्रांविषयी माहिती देत मतदान करुन घेत होते.तर दोन्हीही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडुन मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणने-नेण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली होती. संपुर्ण दिवसभर मतदान केंद्रांच्या बाहेर कार्यकर्ते व नागरिकांची प्रचंड गर्दी होती.

पुणे ग्रामीण अधिक्षक संदिप पाटील यांनी अचानकपणे शिरुर शहरातील विद्याधाम प्रशाला येथील मतदान केंद्रांस भेट देउन पाहणी केली.मतदान प्रक्रियेदरम्यान किरकोळ अपवाद वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.शिरुर हवेली मतदारसंघात शिरुर तालुक्यातील गावांसह हवेली तालुक्यातील वाघोली,लोणी काळभोर, उरळी कांचन, लोणीकंद  या गावांचा सहभाग होतो. मतदानासाठी शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सिलबंद करुन कुकडी वसाहत येथे ठेवण्यात आली असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. गुरुवार (दि.२४) रोजी मतमोजणी प्रक्रिया कुकडी वसाहत येथील सभागृहात पार पडणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या