Video: अशोक पवार यांचा 41,504 मतांनी विजय

शिरूर, ता. 25 ऑक्टोबर 2019: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांनी 41,504 इतक्‍या मताधिक्‍याने भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांचा पराभव केला.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख 83 हजार 886 मतदारांपैकी दोन लाख 58 हजार 13 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान, गुरुवारी (ता. 24) शिरूर येथे कुकडी हॉलच्या सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली. या मतमोजणीत राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांना 1 लाख 45 हजार 131 इतकी तर महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांना एक लाख तीन हजार 627 इतकी मते मिळाली. तर वंचित विकास आघाडीचे चंदन सोंडेकर हे 3140 मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मनसेचे कैलास नरके यांना 1926 मते मिळाली. 1819 मतदारांनी नोटाचा मताधिकार वापरला. टपाली मतदानात ऍड. पवार यांना 393 तर पाचर्णे यांना 257 मते मिळाली. एक मतदानयंत्र बंद पडल्याने व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात आल्याने अंतिम निकाल जाहीर करण्यास उशीर झाला.

इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : अपक्ष उमेदवार रघुनाथ भवार (907), अमोल लोंढे (741), चंद्रशेखर घाडगे (177), ऍड. नरेंद्र वाघमारे (618), नितीन पवार (332), सुधीर पुंगलिया (235).

शिरूर येथील कुकडी वसाहत येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली 100 कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी करण्यात आली. एकूण 14 टेबलवर मतमोजणी झाली. एकूण 28 फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासूनच अशोक पवार यांनी मताधिक्‍य घेण्यास सुरवात केली. पाचवी फेरीत पाचर्णे यांना 770 मताधिक्‍य वगळता अखेरच्या फेरीपर्यंत अशोक पवार यांचेच मताधिक्‍य वाढत गेले. पवार यांना शिरूरमधून सुमारे 22 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्‍य तर लोणीकंद, फुलगाव, पेरणे तसेच वाघोलीचा भाग वगळता हवेलीतही उर्वरित मताधिक्‍य मिळाल्याने मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी विजयाचा मोठा जल्लोष केला. दुपारी दीड वाजता शिरूर-हवेलीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर ऍड. पवार हे प्रकाश धारीवाल यांच्या सोबत मतमोजणी केंद्रावर आले. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला....त्यांना धडा शिकवला
शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून झालेला माझा विजय हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील प्रेम, अजितदादांवरील विश्‍वास, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयीच्या आकांक्षांचा विजय असून, शिरूर व हवेलीतील सामान्य जनता व नवमतदार असलेल्या तरुणांच्या एकजुटीचा हा विजय आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी हे निष्क्रिय होते, हेच हा निकाल सांगतो. गतवेळी लाटेच्या राजकारणात चुकून ते निवडून आले होते; परंतु, मतदारसंघाच्या विकासाकडे त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे सामान्यांनीच निवडणूक हातात घेऊन त्यांना धडा शिकवला,'' अशी प्रतिक्रिया अशोक पवार यांनी व्यक्त केली.
 
ते म्हणाले, "एका बाजूला धनशक्ती होती; तर दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांचे नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेली विकासाची, शेतकरी समाजाच्या भल्याची कामे व अभेद्य जनशक्ती होती. आमच्यातीलच काही नेते दिवसा आंबेगाव मतदारसंघातील आमच्या मोठ्या नेत्यांच्या गाडीत फिरायचे आणि शिरूरमध्ये राजरोस, उघडपणे विरोधी प्रचार करायचे. मात्र, सामान्य मतदारांनी त्याची कसलीही तमा बाळगली नाही. सामान्य, निष्ठावान मतदारांनीच त्यांना विक्रमी मताधिक्‍क्‍यातून सणसणीत चपराक दिली आहे,'' असा टोला अशोक पवार यांनी लगावला.

शिरूर-हवेलीत गयारामांना धक्का...
शिरूर-हवेली मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या ऍड. अशोक पवार यांच्या विजयाने पक्षातून बाहेर गेलेल्या गयारामांना धक्का बसल्याची चर्चा आहे. अशोक पवार यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेत अखेर भाजपचे बाबूराव पाचर्णे यांना पराभूत केले. निवडणुकीपूर्वी अनेक राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीसमोर मोठे आवाहन उभे केले होते. अशोक पवार यांना पराभूत करणे हेच ध्येय गयारामांनी प्रचारात गाठण्याचा प्रयत्न केला होता. अशोक पवार यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी आदींच्या सभा झाल्या. या सभांना दोन्ही तालुक्‍यांतील मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला. बाबूराव पाचर्णे यांच्यासाठी शिरूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा टोलेजंग रोडशो झाला होता. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये न जाता नेहमीच्या स्टाइलने अशोक पवार यांच्याविरुद्ध छुपा प्रचार करून त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना मतदारांनी अजिबात जुमानले नसल्याचे निकालावरून सिद्ध झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या