तळेगावमधील वेळ नदीवरील पुल पावसामुळे पाण्याखाली

Image may contain: one or more people, outdoor, nature and waterतळेगाव ढमढेरे, ता. 25 ऑक्टोबर 2019 (आकाश भोरडे): शिरूर तालुक्यासह सर्वच भागात चांगलाच पाऊस झाल्याने वेळ नदीला पूर आला आहे. त्यामुळे तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्यावरील वेळ नदीवर असणारा पुल सलग दुसऱ्या दिवशी ही पाण्याखाली गेला आहे.

शिरूर तालुक्यातील सर्व धरणक्षेत्रात चार-पाच दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने वेळ नदीवर असणारे सर्व बंधारे सध्या दुथडी भरून वाहत आहेत. तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्याच्या वेळ नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी असल्याने हा पुल वारंवार पाण्याखाली जातो. पावसाळ्यात अनेक वेळा पुलावरून पाणी वाहत असल्याने इतर गावांचा तळेगावशी असणारा संपर्क तुटून नागरिकांचे हाल होत आहेत, असे असताना देखील संबंधित प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

वेळ नदीला पूर आल्याने निमगाव म्हाळूंगी, पारोडी, दहिवडी, टाकळी भीमा, कासारी, उरळगाव, घोलपवाडी, न्हावरा आदी गावांतील नागरिकांचा पूर्णतः संपर्क तुटतो. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा नागरिक नाइलाजाने पुलावरील पाण्यातून येण्याचे धाडस करीत असतात. यामुळे गेल्या वर्षी घोलपवाडी येथे एका तरूणाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.

शिक्रापूरहून न्हावर्‍याला जाण्यासाठी हा अतिशय जवळचा मार्ग आहे. परंतु, अनेकवेळा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या पुलाची लवकरात लवकर उंची वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या