Video: अवैध वाळू उपसा थांबणार कधी?

शिंदोडी ता. २९ ऑक्टोबर २०१९ (तेजस फडके ) शिरूर तालुक्यातील घोड धरणात सुमारे दोन महिन्यांपासून अवैधरीत्या बेसुमार वाळुउपसा चालु असुन शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असतानाही महसुल खात्यातील वरीष्ठ अधिकारी जाणीवपुर्वक या अवैध वाळु उपशाकडे का दुर्लक्ष करत आहेत हे कोड सर्वसामान्य नागरिकांना पडलं आहे.

निमोणे येथील  पिंपळाचीवाडी येथे एक वाळु माफिया स्वतःला शिरुर तालुक्यातील भ्रष्टाचार विरोधी संघटनेचा तालुका अध्यक्ष असल्याचे सांगुन घोड धरणाच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतुन दादागिरी करुन वाळुउपसा करत आहे.परंतु महसूल खात मात्र जाणीवपुर्वक या वाळु माफियाला पाठीशी घालत असल्याने "कुंपणच शेत खातंय" असा काहीसा प्रकार होताना दिसत आहे.त्यामुळे आता न्याय मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 या अवैध वाळु वाहतुकीमुळे शिंदोडी-निमोणे तसेच निमोणे-कारेगाव या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांचे या खड्यांमुळे अतोनात हाल होत आहेत.वाळु वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही डोळ्यावर पट्टी असल्यासारखे दुर्लक्ष करत आहेत.

शिंदोडी येथील RTI कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड यांनी वेळोवेळी अवैध वाळुउपशा बाबत शिरुरच्या तहसिलदार लैला शेख यांच्याकडे तक्रार केली असुनही वाळुमाफियांवर काहीच कारवाई झाली नसल्याचे त्यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले. तसेच वरीष्ठ अधिकारी कारवाई करण्यासाठी आले तरीही कारवाई ना करता दुसरीकडेच जिलेटीन लावून बोटी फोडल्याचा बनाव करत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांचेच येथील वाळुमाफियांशी आर्थिक लागेबांधे असल्याचे समोर येत आहे. तसेच कारवाई होण्यापुर्वीच वाळुमाफियांना कारवाई होणार आहे याची आधीच खबर लागत आहे.तसेच शिरुरच्या तहसिलदार तसेच पुणे येथील गौण खनिज विभागाचे वरीष्ठ अधिकारीही पत्रकारांचे फोन उचलण्यास टाळाटाळ करत असल्याने वाळु माफिया व या अधिकाऱ्यांचे काही आर्थिक लागेबांधे तर नाहीत ना.. ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिरुर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ऍड अशोक पवार या अवैध वाळुउपशा बाबत काय...? भुमिका घेणार याच्याकडे शिरुर तालुक्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या