श्रीराम शेतकरी मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा

रांजणगाव गणपती, ता. ४ नोव्हेंबर २०१९ (आकाश भोरडे): तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील श्रीराम शेतकरी मंडळाची गट मासिक बैठक व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम तळेगाव ढमढेरे शेतकरी अवजार बँक येथे नुकताच पार पडला. यावेळी मासिक बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. गटाचे सचिव यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले.

वर्षभराच्या व्यवहारांमध्ये गटाला 63 हजार 830 रुपये व्याज व दंड स्वरूपात मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. गटाला अधिक यशस्वी होण्यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य नेहमीच मिळत असल्यामुळे गटातील एकही थकबाकीदार खातेदार नसल्याचेही त्यांनी यावेळेस नमूद केले. दुपारच्या सत्रात सेंद्रिय शेती संदर्भात रासायनिक खते व औषधे यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व जमिनीची होणारी धूप ह्या विषयावर डॉ.अनुरिता सकट यांनी मार्गदर्शन केले. साळवे एमडी आयुर्वेदिक ग्रूमिंग साई हेल्थ सेंटर पुणे आयुर्वेद कन्सल्टंट यांच्या वतीने एलईडी स्क्रीन च्या माध्यमातून प्रोजेक्टरवर शेतकर्‍यांना साध्या समजेल अशा भाषेत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमासाठी गटातील साठ-सत्तर शेतकरी तसेच परिसरातील सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी उपस्थित होते. रासायनिक खताचा होत असलेला अतिवापर, त्यामुळे लोकांमध्ये  बळावलेले अनेक कॅन्सरसारखे आजार त्यामुळे आरोग्य वर होत असलेला धोका हे थांबवण्यासाठी  सेंद्रिय आयुर्वेदिक पद्धतीने शेतीमध्ये करावयाचे बदल आदि  विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेवटच्या  सत्रामध्ये गेली पाच वर्ष अथक परिश्रम करून श्रीराम शेतकरी मंडळाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले त्याचाच एक भाग म्हणून सभासदांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्य करणाऱ्या गटातील सर्व सभासदांना दिवाळीनिमित्त गटाच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले.

यावेळी अनुरिता सकट मॅडम, भाऊसाहेब बामदळे, ॲग्रोवन पुणे संपादक प्रतिनिधी संदीप नवले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गटाचे अध्यक्ष अरविंद चौधरी उपाध्यक्ष जालिंदर ढमढेरे सचिव गणेश ढमढेरे व सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन श्रीराम शेतकरी मंडळ गटाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत ढमढेरे व घनश्याम तोडकर यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या