Video: वाघाळे येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शिक्रापूर, ता. ६ नोव्हेंबर २०१९ (शेरखान शेख): वाघाळे (ता. शिरुर) येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तसेच दुष्काळामुळे शेतात सुरु असलेले पंचनामे करण्यास तलाठी व कृषी अधिकारी दिरंगाई व मनमानी करत असल्याच्या कारणातून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.

वाघाळे (ता.शिरुर) येथील शेळके वस्ती येथे राहणारे भिवाजी बबन शेळके (वय ४२) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत भिवाजी यांचे पुतणे सोमनाथ शेळके यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या खबर नुसार भिवाजी हे दुपारच्या सुमारास रस्त्याने रडत रडत चालले होते, आणि त्यांची पत्नी त्यांच्या मागे पळत होती. त्यांनतर भिवाजी यांनी काही अंतरावर असलेल्या विद्युत रोहीत्राजवळ जाऊन इलेक्ट्रिक वायरला हात लावला आणि यावेळी भिवाजी हे खाली पडले.
त्यावेळी येथील सोमनाथ शेळके, अतुल शेळके, अशोक शेळके यांनी भिवाजी यांना शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असताना येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत सोमनाथ रामदास शेळके (रा. वाघाळे) ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून,  याबाबत आकस्मात मयत प्रकरणी नोंद करून सदर गुन्हा पुढील तपासासाठी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे वर्ग करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मयत भिवाजी शेळके यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. भिवाजी यांचेवर कर्ज होते त्यापैकी काही कर्ज सोसायटीचे होते तर काही कर्ज खासगी होते तसेच सोसायटीने त्यांना यापूर्वी नोटीस देत जमीन जप्त करण्यात येईल अशा सूचना दिलेल्या होत्या. त्यातच सध्या सर्वत्र ओला दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना वाघाळे गावामध्ये सुरु असलेले पिकांचे पंचनामे करणारे तलाठी एस. एस. गायकवाड व कृषी सहाय्यक डी. एम. कोंडे हे व्यवस्थित पंचनामे करत नसून, पंचनामे करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे भिवाजी हे त्रस्त झाले होते.

त्याच नैराश्यातून भिवाजी शेळके यांनी आत्महत्या केली असल्याचे गावातील ग्रामस्थ व नातेवाइकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शिरूर तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात भेट देत मयत शेतकरी यांचे नातेवाईक व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. मयत शेतकऱ्यास शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या