निमोणे येथे भिशीचे १० लाख चोरटयांनी लुटले...

निमोणे, १२ नोव्हेंबर २०१९ (प्रतिनिधी): निमोणे (ता. शिरूर) येथे भिशीचे पैसे घरी घेऊन घरी निघालेल्या व्यक्तीस रस्त्यात अडवून मारहाण करून सुमारे १० लाख रुपये चोरल्याची घटना घडली असून, त्यामुळे निमोणे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनला भरत भाऊसाहेब काळे (रा.निमोणे, काळेवस्ती) यांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द फिर्याद दाखल केली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १०)  भरत काळे हे दिलीप जाधव यांच्या घरी भिशी असल्याने गेले होते. रात्री १० नंतर भीशीच्या पैशाचा लिलाव झाला भीशीत मिळालेले दहा लाख रुपये रक्कम घेऊन ते स्वतः च्या दुचाकीवरून घराकडे निघालेले होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या उजव्या बाजूस बिगर नंबर ची स्विफ्ट गाडी उभी असल्याचे दिसले. त्यानंतर १०० मीटर अंतर गेल्यानंतर अचानक उसाच्या कडेलगत पल्सर या दुचाकी वाहनांवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी काळे यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली. तसेच चार ते पाच  चोरटे समोर येऊन उभे राहिले. यावेळी काही वेळ काळे यांनी सदरील चोरट्यांशी प्रतिकार केला. मात्र, चोरट्यांनी काळे यांना तलवारीचा धाक दाखविल्याने काळे हे घाबरून गेले. ही संधी साधत चोरट्यांनी काळे यांच्या जवळील रोख रक्कम दहा लाख रुपये, दोन मोबाईल व जवळील कागदपत्रे चोरून पळ काढला.

याप्रकरणी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या