पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर सापडला उपाय..

शिरूर, ता. १८ नोव्हेंबर २०१९ (सतीश डोंगरे) : पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीने प्रवासी आणि वाहन चालक सर्वच हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला असताना शिरूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या वाहतूक कोंडीवर साधा सोपा रामबाण उपाय सुचविला आहे.

संबंधित उपाय प्रशासनाला सादर केला आहे. प्रशासनाने मनावर घेतल्यास दोनच दिवसात यावर तातडीने तोडगा निघू शकतो. शिवाय, संपूर्ण राज्यातील वाहतूक कोंडीसाठी हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सहापदरी रस्ता आणि उड्डाणपूल हा कायमस्वरूपी तोडगा असला तरी त्यासाठी खूप अवधी जाणार आहे. मात्र, सध्या आहे त्या परिस्थितीत शंभर टक्के वाहतूक कोंडी कमी करणारा साधा सोपा 'रहदारी आराखडा' या सामाजिक कार्यकर्त्याने तयार केला आहे.

या आराखड्यानुसार प्रवासी आणि वाहन चालकांची कोंडीतून निश्चित सुटका होणार असून, सर्वांनाच दिलासा मिळणार आहे, असा या कार्यकर्त्याचा दावा आहे. पुणे-नगर रस्त्यावर वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर याठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविल्यास आणि त्यामध्ये अपेक्षित यश मिळाल्यास भविष्यात सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, नाशिक रस्त्यावर ही हा आराखडा फायदेशीर ठरणार आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हा आराखडा मैलाचा दगड ठरू शकतो. विशेष म्हणजे या आराखडय़ासाठी कुठल्याही मोठ्या गुंतवणूकीची अगर मनुष्यबळाची गरज नसून, अतिशय साधा सोप्या पद्धतीने हा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, स्थानिक नागरिक आणि शिस्तबद्ध वाहनचालक या सर्वांचाच स्वयंस्फूर्तीने सहभाग आवश्यक आहे. या वाहतूक कोंडीने आत्तापर्यंत अनेकांचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन या आराखड्याचा किती गांभीर्याने विचार करते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, तो आराखडा नेमका कसा आहे, याबाबतची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या