कंपन्यांच्या दूषित सांडपाण्यामुळे तलावातील मासे मृत...

पिंपळे जगताप येथील घटना; ग्रामस्थांची कंपन्यांवर कारवाईची मागणी 
केंदूर, ता. 19 नोव्हेंबर 2019 (वार्ताहर) :
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील प्रथम दर्शनी भारत आणि एचपीसीएल कंपनीच्या केमिकल मिश्रण रहित दूषित सांडपाणी गावच्या पाझर तलावात पाइप लाईन द्वारे सोडल्यामुळे तलावातील मासे मृत पावल्याचे समोर आले आहे.

सलग सात ते आठ दिवस भारत आणि एचपीसीएल कंपनीने दूषित पाणी गावच्या गायरान भागात असलेल्या पाझर तलावाच्या बाजूला मोठा खड्डा खंदून त्यात पाईप लाईन द्वारे पाणी सोडले, त्या खड्ड्यात पाणी जास्त झाल्याने हे प्रदूषित पाणी थेट पाझर तलावात गेल्याने तलावातील मासे मृत पावले असल्याची माहिती समोर आली आहे. तलावाच्या शेजारीच गावची पाणी पुरवठा विहीर असल्याने गावातील नागरिकांनाही भविष्यात साथीच्या भयंकर आजारांना सामोरे जाण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे याच गायरान भागात गावातील शेतकरी चाऱ्याच्या शोधात आपली जनावरे चरायला घेऊन येतात. ही जनावरे याच तलावातील पाणी पितात. तलावातील मासे मृत पावल्यामुळे शेतकरी आपली जनावरे गायरानमध्ये चारण्यासाठी देखील घेऊन येत नाहीत.

तलावामध्ये मत्स्यबीज सोडून मत्स्यपालन व्यवसाय करण्याचे शासकीय कंत्राट गावातील शेतकरी रमेश नाथोबा दौंडकर यांना मिळाले असल्याने दौंडकर यांनी तलावात मत्स्यबीज सोडून मत्स्यपालन करून उदरनिर्वाह करत आहेत. परंतु, तलावात काही कंपन्यांनी दूषित पाणी सोडल्याने तलावातील मासे मृत पावल्याने दौंडकर हवालदिल झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दौंडकर आणि इतर काही ग्रामस्थांनी मिळून मंडल अधिकारी यांच्याकडे तक्रार करून पाहणी करण्याचा अर्ज केला होता. त्यानंतर मंडल अधिकारी चंद्रशेखर ढवळे यांनी या प्रकरणाचा पंचनामा करून शिरूरच्या तहसीलदारांकडे पाठवला असल्याचे ढवळे यांनी सांगितले.

पंचनामा केल्यांनतर ग्रामस्थ आणि अधिकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीत जाण्यास मज्जाव केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे दूषित पाणी आमच्या कंपनीचे नसल्याचे सांगत आहेत. यापूर्वी देखील अनेकवेळा ग्रामपंचायतने हद्दीतील सर्व कंपन्यांना सांडपाण्याची व्यववस्था करण्याचे वारंवार पत्रकाद्वारे कळविले होते. मात्र, कंपनी प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रादार दौंडकर यांच्या झालेल्या नुकसानीचा आणि दूषित सांडपाण्यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांपासून शासनाने आम्हाला वाचवण्यासाठी संबंधित कंपन्यांवर शासनाने योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दरम्यान, भारत गॅस कंपनीचे अधिकारी गोपाल हटकर यांच्याशी संपर्क साधला असता हे दूषित पाणी आमच्या कंपनीचे नसल्याचे हटकर यांनी सांगितले. एचपीसीएल कंपनीचे अधिकारी बाबासाहेब सोनावणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या