वाघाळे परिसरात रात्री बिबट्यांची भिती; दिवसा वीज नाही...

Image may contain: 3 people, people sitting and indoorवाघाळे, ता. 29 नोव्हेंबर 2019: दिवसा वीज नाही अन् रात्री बिबट्या आणि सापांची भिती अशा दुहेरी अडचणीत येथील शेतकरी सापडले आहेत. यामुळे दिवसा थ्री फेज वीज पुरवावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. तातडीने हा बदल न केल्यास या परिसरातील शेतकरी उपोषण करणार आहेत, अशी माहिती गावचे माजी सरपंच तुकाराम भोसले यांनी दिली.

बिबट्याचा वावरामुळे रात्री-अपरात्री शेतात पाणी देण्यासाठी जाणे जोखमीचे झाले आहे. त्यामुळे महावितरणने रात्रीची थ्री फेज वीज देऊन शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून दिवसा थ्री फेज वीज पुरवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परतीच्या पावसामुळे पाण्याची उपलब्धता झाली आहे. मागील हंगामात अगोदर दुष्काळाने शेतीचे नुकसान झाले. नंतर परतीच्या पावसाने शेतीत पीक घेता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गावात भारनियमन असल्याने रात्रीचा थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. या परिसरात बिबट्यांचे प्रमाण वाढले असून बिबट्यांपासून शेतकऱ्यांना धोका वाढला आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, तातडीने हा बदल न केल्यास या परिसरातील शेतकरी उपोषण करणार असल्याची माहिती माजी सरपंच तुकाराम भोसले यांनी दिली. या बाबत रांजणगाव महावितरण कार्यालयाला माहिती दिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या