Ranjangaon MIDC: नोकरी देणाऱया टोळीचा फर्दाफाश

Image may contain: one or more peopleशिरूर, ता. 2 डिसेंबर 2019 : "मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी' अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवून करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

अंकुश रावसाहेब मलगुंडे (वय 28, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे), साहिल सतीश कोकरे (वय 20, रा. भटेवाडी, ता. जामखेड, जि. नगर), महेश रमेश काळे (वय 21, रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. नगर) व जयश्री भगवान कांबळे (वय 21, रा. यश इन चौक, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही टोळी सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना छोट्या-मोठ्या कंपनीत अंगमेहनतीची कामे देत व याविरोधात जाब विचारणारांना मारहाण करून हाकलून देत, अशी माहिती रांजणगाव एमआयडीसील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

सुधाकर कोळेकर, संतोष घावटे, मंगेश थिगळे, चंद्रकांत काळे, ज्ञानेश्‍वर शिंदे, प्रफुल्ल भगत, निर्मला ओव्हाळ या पोलिस पथकाने गेल्या महिनाभरापासून अशा टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. काही दिवसांपूर्वी अभिजित युवराज पाटील व शंतनू शिवाजी पाटील (रा. विसूर, ता. मिरज, जि. सांगली) हे एमआयडीसीतील एका कंपनीजवळ घाबरलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर पोलिसांनी त्यांना विश्‍वासात घेत विचारले असता, त्यांनी मारहाण झाल्याचे व नोकरीच्या नावाखाली लुटल्याचे सांगितले.

एका वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून आम्ही नोकरीच्या निमित्ताने येथे आलो. रांजणगाव बस स्थानकावर उतरल्यानंतर जाहिरातीत नमूद केलेल्या मोबाईलवर संपर्क केला असता, "तेथेच थांबा कंपनीची गाडी तुम्हाला घ्यायला येईल', असे एका महिलेने सांगितले व आम्हाला घेण्यासाठी एक स्विफ्ट मोटार पाठवली. बिगर क्रमांकाच्या या मोटारीतून एका कंपनीच्या गेटवर नेले. तेथे, दोघेजण थांबले होते. त्यांच्याकडील दुचाकीलाही क्रमांक नव्हता. त्यांनी नोकरीचे शुल्क प्रत्येकी 1500 रुपये घेतले व काही वेळाने पुन्हा शूजसाठी म्हणून 950 रूपयांची मागणी केली. हे संशयास्पद वाटल्याने पैसे देण्यास नकार दिला असता, त्या तिघांनी मारहाण केली. इतरही सात-आठ जणांना अशाच प्रकारे मारहाण केली. काहींना कंपनीत कामाला लावण्याच्या नावाखाली वर्कशॉपमध्ये तुटपुंज्या पगारावर अंगमेहनतीची कामे दिली व जाब विचारला असता, मारहाण करून हाकलून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काही तरुणांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

नोकरीच्या नावाखाली सोशल मीडिया, एसटीबसेस, सार्वजनिक ठिकाणी हे नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी म्हणून जाहिरात करत होते. वेगवेगळ्या जिल्ह्यात जाहिराती प्रसिद्ध होत असल्यामुळे अनेक बेरोजगार युवक संपर्क साधत होते. त्यांना लुटण्याचा धंदा अनेक दिवसांपासून सुरू होता. यामध्ये अनेकांना भुर्दंड पडला आहे. शिवाय, शिरूर तालुक्याचे नावही बदनाम होत होते.  www.shirurtaluka.comने याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसारित केले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, 'सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी फसव्या जाहिरातींची शहानिशा करावी व वर्तमानपत्रांनीही फसव्या जाहिराती देताना काळजी घ्यावी. सुशिक्षित बेरोजगारांना लुटणाऱ्या, मारहाण करणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी संबंधितांनी न घाबरता पोलिसांपर्यंत यावे. त्यांचे नाव गुप्त ठेवून अशा लूटमार करणाऱ्या टोळ्यांचा नायनाट करू.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या