'त्या'नंतर ११ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा चेक...

वडगाव रासाई ता, ९ डिसेंबर २०१९ : (संपत कारकूड) विमा उतरविल्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या "भारतीय एकसा" कंपनीने आपल्या विरोधात तक्रार  झाल्यानंतर तत्काळ ११ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा चेक दिला.

वडगाव रासाई येथील शेतकरी संतोष किसन शेलार व अन्य १० शेतकऱ्यांनी "भारतीय एकसा" या विमा कंपनीकडे गहू,कांदा व इतर रब्बी पिकांचा २०१८ मध्ये रीतसर विमा उतरविला होता.दरम्यान जानेवारी २०१९ मध्ये मोठा गारपिटीचा पाऊस होऊन रब्बी पिकांचे नुकसान झाले होते.वरील विमा कंपनी व कृषी विभाग पुणे यांनी नुकसानीचे संयुक्त पंचनामे केले. पंचनामा झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये पिकांची नुकसान भरपाई मिळणे बंधनकारक असतानाही तब्बल ११ महिने कंपनीने आपले हात आखडले होते.
       
दुसरीकडे पंचनामे उरकल्या नंतर ९५ ते ९८ टक्के हिस्सा "भारतीय  एकसा" ला पोचल्यानंतरही  कंपनीने मात्र नुकसान देण्यास उशीर केला.यामध्ये गोलमाल होण्याची शंका आल्याने वडगावचे बाधित शेतकरी व ग्राहक पंचायत कार्यकरणी सदस्य संतोष किसन शेलार याची तक्रार केली.त्यांनी तालुका कृषी अधिकारी शिरूर,कृषी आयुक्त (सांख्यिक) पुणे,जिल्हाधिकारी पुणे,अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून ही बाब निदर्शनास आणून दिली.त्याचा शासन ते विमा कंपनी स्तरावर पाठपुरावा केला. तसेच विमा भरपाई न दिल्यास संबधित कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.अखेर विमा कंपनीला खडबडून जाग आली. आणि त्यांनी घाईघाईने वडगाव रासाई येथील ११ शेतकऱ्यांना चेकद्वारे भरपाई दिली.

पैसे मिळाल्यानंतर सर्व शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला असून कृषी सहायक आण्णा महाराज फराटे यांनी  मोलाचे  सहकार्य केले. अशा  प्रकारे  कोणाची पीक विमा तक्रार असल्यास त्यांनी संतोष शेलार यांच्या मोबाइल क्रमांक ९४०४९५९३७७ वर संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या