पेरणेफाटा येथे असा असणार फौजफाटा अन् ...

कोरेगाव भीमा, ता. 12 डिसेंबर 2019 : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत्या एक जानेवारीला येणाऱ्या बांधवांसाठी प्रशस्त पार्किंग, अंतर्गत बस वाहतुकीसह सर्व आवश्‍यक सुविधांचा जिल्हा प्रशासनाने आढावा घेत यंत्रणा सज्ज केली आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. यावर्षीही मोठ्या बंदोबस्तासह 10 किलोमीटर क्षेत्रावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचे लक्ष असणार आहे.

स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी प्रशासनाने कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक (ता. शिरूर) व पेरणे विजयस्तंभ येथे बुधवारी बैठका घेतल्या. यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, शिरूरचे तहसीलदार श्रीमती लैला शेख, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सदाशिव शेलार, शिरूरचे गटविकास अधिकारी विजय नलावडे, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, नायब तहसीलदार सुनील शेळके, साहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर, पंचायत समिती सदस्या संजीवनी कापरे, कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, पेरणे येथील सरपंच रूपेश ठोंबरे, उपसरपंच रवींद्र वाळके उपस्थित होते.

यावर्षी 11 पार्किंगची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून जवळच खाद्य पदार्थांचे स्टॉल, लाऊड स्पीकर्स, विद्युत दिवे बसविण्यात येणार आहेत. वाहनतळापासून स्तंभापर्यंत अंतर्गत वाहतुकीसाठी 200 बस तसेच 150 पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था तसेच 10 किलोमीटर अंतरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडिओ कॅमेरे, तसेच ड्रोन कॅमेऱ्याने विशेष लक्ष असणार आहे. तर आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्रणा, फायर बलुन्सही सज्ज असणार आहे.

दरम्यान या परिसरातील स्टॉलवरील खाद्य पदार्थांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी, विजयस्तंभ ते टोलनाका परिसरात विद्युत दिवे बसवणे, 600 मोबाईल शौचालय, त्याचप्रमाणे मानवंदनेसाठी येणाऱ्या बांधवांना पिण्याचे पाणी, अल्पोपाहार व जेवणाच्या व्यवस्थेसाठी सामाजिक संस्था व ग्रामपंचायती पुढाकार घेणार आहेत. कोरेगावात गल्ल्यांना बॅरीगेटींगही करण्यात येणार आहे.

असा असेल पोलिस बंदोबस्त व व्यवस्था...
अप्पर पोलिस अधीक्षक 9 , उपविभागीय पोलिस अधिकारी 41 , पोलिस निरीक्षक 133 , दुय्यम अधिकारी 363, पोलिस कर्मचारी 3850, महाराष्ट्र पोलिस कर्मचारी 347, वाहतूक पोलिस कर्मचारी 496 , होमगार्ड 700, 14 एसआरपी कंपनी, 13 आरसीपी कंपनी असा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तर समता सैनिक दलाचे जवान, 700 शांतिदूत, सरकारी 30 वाहने, लाइट व्हॅन 20 वाहने, इतर वाहने 174 , वॉकीटॉकी 580 , बॅरिगेट 485 , ड्रोन कॅमेरे 12 , पीए सिस्टिम 35 , अग्निशमन वाहन 33 , खासगी वाहने 200 , पाण्याचे टॅंकर 133 , क्रेन 16 , ऍम्ब्युलन्स 200 , फायर बलुन्स 200 , कॅमेरे 25 , सीसीटिव्ही 300 , दुर्बीण - 20 , व्हिडिओग्राफर 20 अशा सुसज्ज यंत्रणेद्वारे बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या