मौजमजेसाठी पुतण्यांनी भिशीचे 10 लाख लुटले पण...

रांजणगाव गणपती, ता. 13 डिसेंबर 2019: हाताने मारहाण करून तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील भिशीचे १० लाख रुपये, मोबाईल, गाडीची कागदपत्रे आणि एटीएम कार्ड लांबविले. कशासाठी तर फक्त मौजमजेसाठी. कोणी लुटले तर पुतण्यांसह दोन साथीदारांनी. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

निमोणे (ता. शिरूर) येथे १० नोव्हेंबर रोजी एकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडील १० लाख रुपये लुबाडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी आठ जणांना अटक केली असून, मौजमजेसाठी पैसे मिळविण्याकरिता दोन पुतण्यांनीच त्यांच्या साथीदारांसह चुलत्याला लुबाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. निमोण्यातील भरत भाऊसाहेब काळे हे दिलीप काशिनाथ जाधव यांच्या घरून भिशीच्या लिलावाचे पैसे घेऊन मोटारसायकलवरून घरी जात होते. निमोणे ते काळेवस्ती रस्त्यावर तोंडाला मास्क लावलेल्या काही व्यक्तींनी नंबर नसलेली मोटार व दुचाकीवरून येऊन त्यांना अडविले. हाताने मारहाण करून तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील भिशीचे १० लाख रुपये, मोबाईल, गाडीची कागदपत्रे आणि एटीएम कार्ड लांबविले.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पोलिस पथकाच्या मदतीने तपास केला असता हा गुन्हा भरत काळे यांचा पुतण्या अक्षय नानासाहेब काळे याने त्याचा भाऊ दत्तात्रेय व अन्य साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. अक्षय काळे (रा. निमोणे) याला ताब्यात घेतले असता, त्याने दत्तात्रेय नानासाहेब काळे, रोहित प्रमोद कर्डिले, अनिल शिवाजी काळे (तिघे रा. निमोणे), वैभव बाळासाहेब आरवडे, योगेश केशव मचाले, मिनिनाथ विलास गव्हाणे, अमोल आनंदा चौगुले (रा. मांडवगण) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख ८ हजार रुपये जप्त केले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या