शिरूर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱयाला अटक

शिरूर, ता. 14 डिसेंबर 2019 : कर्डे (ता. शिरूर) जवळ बांधकाम सुरू असलेल्या कंपनीतील सुमारे दहा लाख 75 हजार रुपये किमतीचे लोखंडी पत्रे व सळयांची चोरी केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी गुरुवारी (ता. 12) रात्री चौघांना अटक केली आहे. यात भाजप विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह या कंपनीच्या सुरक्षारक्षकाचा समावेश आहे.

प्राइम कोल्ड प्रा. लि. या कंपनीचे संचालक शेख मोहंमद हबीब यांनी याबाबत तक्रार दिली. कर्डेजवळील संबंधित कंपनीतील बांधकाम साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनी प्रशासनाने पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानुसार रविवारी (ता. 8) चोरीचा गुन्हा दाखल करून तपास केला असता, कंपनीतच सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा आबा विठ्ठल जगदाळे याने वेळोवेळी कंपनीतील बांधकाम साहित्याची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने कंपनीतील कोल्ड स्टोअरेजच्या कामासाठी आणलेले पत्रे व सळया मिलिंद वाळके यांना विकल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, जगदाळे व वाळके यांच्यातील या देवाण-घेवाणीची माहिती भाजप विद्यार्थी आघाडीचा जिल्हाध्यक्ष विशाल घायतडक; तसेच बंटी घायतडक यांना समजताच, त्यांनी याबाबत पोलिसांना कळविण्याची धमकी दिली व त्याबदल्यात जगदाळे याच्याकडून वीस हजार रुपये घेतले. याबाबत पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सर्व संशयितांना ताब्यात घेऊन संबंधित चोरी प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. तपासातून चोरीचा उलगडा झाला असून, संशयितांकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचे पत्रे व चोरीच्या साहित्याच्या विक्रीतून आलेले वीस हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या