शिरूर पोलिस ठाण्यात 3 आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न

No photo description available.शिरूर, ता. 19 डिसेंबर 2019 : शिरूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिन संशयित आरोपींनी बुधवारी (ता. 18) 'रोगर' हे विषारी तणनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय, पोलिस चौकीत "रोगर' औषध कोठून आले, याविषयी प्रश्न चिन्ह आहे.

शिरूर पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात तिघांना ताब्यात घेतले आहे. मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले (वय 23), योगेश केशव मचाले (वय 24) आणि वैभव ऊर्फ दादा बाळासाहेब आरवडे (वय 19, तिघेही रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) अशी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे (ता. शिरूर) येथील भरत भाऊसाहेब काळे यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील दहा लाख रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी शिरूर पोलिस पथक व पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चौगुले, मचाले व आरवडे यांच्यासह रोहित प्रमोद कर्डिले (रा. निमोणे), मीनानाथ विलास गव्हाणे (रा. मांडवगण); तसेच फिर्यादी काळे यांच्या नात्यातील अक्षय नानासाहेब काळे व दत्तात्रेय ऊर्फ पप्पू नानासाहेब काळे (रा. निमोणे) यांना 11 डिसेंबरला अटक केली होती. हे सर्व संशयित शिरूर पोलिसांच्या कोठडीत होते.


बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पोलिसांनी चौगुले, मचाले व आरवडे यांना तपासासाठी कोठडीतून तपास पथकाच्या कक्षात नेले. तेथे बराच वेळ त्यांची कसून चौकशी केली. त्या वेळी त्यांनी पोलिसांचा डोळा चुकवून "रोगर' हे विषारी औषध पिले. पोलिसांनी तातडीने त्यांना येथील खासगी रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांच्या जीवितावरील धोका टळला आहे. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी शिरूर पोलिस ठाण्यात भेट दिली.

दरम्यान, दरोड्यातील आरोपींची पोलिसांच्या स्वतंत्र कक्षात चौकशी करत असताना तेथे तणनाशकाची बाटली पोचलीच कशी? याबाबत चर्चांना उधाण आले होते. या संशयितांना भेटण्यासाठी आलेल्यांपैकी कुणीतरी त्यांना ती बाटली दिली असावी, असा संशय आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या