अनधिकृत विजचोरी करणाऱ्या ७४ जणांविरुद्ध कारवाई

बारामती,ता.१९ डिसेंबर २०१९ (प्रतिनिधी) : वीजबिलांच्या थकबाकीमुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही बारामती मंडलमधील ७४ वीजग्राहक अनधिकृतपणे वीजवापर करीत असल्याचे आढळून आले.त्यांच्याविरुद्ध वीजचोरीच्या १३५ कलमानुसार कारवाई सुरु असून गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजपुरवठा खंडित केलेल्या ७५७ थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महावितरणच्या आॅनलाईन प्रणालीत मोबाईल ॲपद्वारे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्याची चुकीची नोंद करणे,प्रत्यक्षात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित न करणे,थकबाकी वसुल न करणे आदी कारणांवरून बारामती विभागातील ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून एका कर्मचाऱ्यास बुधवारी (दि.१८) रोजी निलंबित करण्यात आले आहे.

वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या घरगुती,वानिज्जीक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगाने सुरु आहे.तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्याची महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद झाल्यानंतर अशा ग्राहकांच्या वीजजोडण्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येत आहे.यासाठी पुणे प्रादेशिक विभागासोबतच परिमंडल,मंडल व विभागस्तरावरील वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या ३ दिवसांपासून ही पथके बारामती मंडलमधील बारामती,इंदापूर,दौंड,शिरुर,भोर व पुरंदर तालुक्यात तपासणी करीत आहेत.रात्रीच्या कालावधीतसुद्धा ही तपासणी सुरु आहे.

बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये (बारामती विभाग) वीजपुरवठा खंडित केलेल्या ३६७ ग्राहकांच्या वीजजोडण्यांची गेल्या तीन दिवसांत तपासणी करण्यात आली.यामध्ये ३० थकबाकीदार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले.भोर व पुरंदर तालुक्यामध्ये (सासवड विभाग) तपासणी केलेल्या १३८ पैकी ५ थकबाकीदारांनी वीजचोरी तर ९ थकबाकीदारांनी शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले.तसेच शिरुर व दौंड तालुक्यामध्ये (केडगाव विभाग) तपासणी केलेल्या २५२ पैकी ३० ग्राहकांकडे चोरीद्वारे वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले.या सर्व ७४ पैकी ६५  थकबाकीदारांविरुद्ध वीजचोरीच्या कलम १३५ अन्वये कारवाई सुरु असून ९ जणांविरुद्ध अनधिकृत वीजवापर केल्याप्रकरणी कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे. यातील ४१ ग्राहकांकडून थकबाकी व दंडाची अशी एकूण ७ लाख ८४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.

चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्र, ई-वाॅलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ऍ़पद्वारे 'ऑनलाईन' सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या